Rohit Pawar on Milind Deora’s Letter to Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी सलग पाच दिवस मुंबईतील आझाद मैदानात उपोषण केलं. मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातून लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाले होते. यामुळे मुंबईत वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावरून शिवसेनेचे (शिंदे) राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित “इथून पुढे आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी बंदी घालावी”, अशी विनंती केली आहे.
देवरा यांची ही मागणी पाहून अनेकांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. “दक्षिण मुंबईचा सातबारा या धनिकांच्या नावावर केलेला नाही”, अशा शब्दांत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला. तर, “मिलिंद देवरा यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे गृह विभागाचे राजकीयदृष्ट्या कपडे काढतायत”, अशा शब्दांत रोहित पवार यांनी देवरांच्या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
आमदार रोहित पवार म्हणाले, “हे पत्र मुख्यमत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलं आहे. गृह विभाग झोपला होता का? असा प्रश्न या पत्राच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. आंदोलनाला किती लोक येणार होते? तुमच्याकडे ही माहिती नव्हती का? तसेच अशी माहिती गृह विभागाकडे असली तरी ती लपवण्यात आली, बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिली नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिलिंद देवरा यांच्या माध्यमातून गृह विभागाचे राजकीयदृष्ट्या कपडे काढत आहेत असं चित्र पाहायला मिळत आहे.”
मिलिंद देवरा यांनी पत्रात काय म्हटलंय?
मिलिंद देवरा यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे की “दक्षिण मुंबईतील आझाद मैदान आणि इतर ठिकाणी वारंवार होणारी आंदोलने आणि मोठ्या मेळाव्यांबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे. लोकशाहीने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिला असला तरी यामुळे सामान्य नागरिकांच्या जगण्याच्या, काम करण्याच्या अधिकारांवर याचा कोणताही परिणाम होऊ नये.”