राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८२ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शरद पवारांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही शरद पवारांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकारणात पदार्पण करण्यापूर्वीची एक आठवण रोहित पवारांनी सांगितली आहे. ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, “व्यावसायिक क्षेत्रात काम करताना शरद पवारांनी सुरुवातीला कधीही कुणालाही मार्गदर्शनाची मदत केली नाही. जेव्हा एखादी व्यक्ती एखादं काम… एका विशिष्ट स्तरापर्यंत पूर्ण करते. म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्वत: कष्ट करता, त्यानंतर जर अडचण आली, तर शरद पवार मार्गदर्शन करतात. त्यांचं नेहमीच म्हणणं असतं की कुणालाही सोपं काही मिळत नसतं. कष्ट हे तुम्हाला करावेच लागतात. पण काहीही करत असताना लोकांचं हित जपणं आवश्यक असतं,” असं रोहित पवारांनी सांगितलं.

हेही वाचा- “…हे कितपत शहाणपणाचं आहे?” वाढदिवशी केलेल्या भाषणातून शरद पवारांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल, म्हणाले, “आजपर्यंत…”

राजकारणात पदार्पण करण्यापूर्वी शरद पवारांनी केलेल्या मार्गदर्शनाबाबत रोहित पवारांनी सांगितलं, “मतदारसंघ निवडत असताना शरद पवारांचं एक वाक्य होतं. सोपा मतदारसंघ घेतलास तर तू आमदार नक्की होशील. पण तू केवळ आमदारच राहशील आणि किती दिवस आमदार राहशील, हेही सांगता येणार नाही. तुला दीर्घ काळासाठी लोकाचं प्रतिनिधित्व करायचं असेल तर तू एक अवघड मतदारसंघ निवड. ज्याठिकाणी तुला खूप काही करता येईल. लोकांना विकासाचं मॉडेल दाखवता येईल. असा मतदारसंघ निवडला तरच तुला अनेक वर्षे लोकांचं प्रतिनिधित्व करता येईल. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. शॉर्टकट किंवा सोप्या गोष्टी करण्यापेक्षा स्वत:ची एक वेगळी वाट निर्माण करण्याची धमक युवा पिढीमध्ये आहे, असं ते नेहमीच सांगतात,” अशी आठवण रोहित पवारांनी सांगितली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar shared memories about sharad pawar and entry in politics on 82th birthday of ncp chief rmm
First published on: 12-12-2022 at 15:14 IST