Rohit Pawar On alleged Two Wheeler Toll : “चारचाकी वाहनांप्रमाणे आता दुचाकी वाहनांकडूनही राष्ट्रीय महामार्गावर टोल आकारला जाऊ शकतो, आता दुचाकी वाहनं देखील टोलच्या कक्षेत आणली जाणार आहेत, येत्या १५ जुलैपासून दुचाकींसाठी टोल आकारला जाऊ शकतो”, असे दावे करत काही प्रसारमाध्यमांनी वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हे दावे फेटाळले आहेतत.

नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे की “केंद्र सरकार दुचाकी वाहनांसाठी टोल आकारण्याचा कोणताही विचार करत नाही आणि अशा कोणत्याही प्रस्तावावर सध्या चर्चा नाही”. मात्र, वृत्तवाहिन्यांवर व समाजमाध्यमांवर या कथित टोलची बरीच चर्चा चालू आहे. समाजमाध्यमांवर अनेकजण केंद्र सरकार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका करत आहेत.

रोहित पवारांचा सरकारला चिमटा

दरम्यान, या कथित टोलच्या बातमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सरकार खरंच असा काही विचार करत असेल तर त्यांनी पायी चालणाऱ्यांडूनही टोल घ्यायला हवा अशा शब्दांत रोहित पवार यांनी सरकारला चिमटा काढला आहे.

रोहित पवार यांनी म्हटलं आहे की “१५ जुलैपासून दुचाकी वाहनांना देखील टोल लागू करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे, असं असेल तर सरकारने आता पायी चालणाऱ्यांकडून देखील टोल घ्यायला हवा, किंबहुना या मार्गावरून उडणाऱ्या पक्षांनाही टोलच्या कक्षेत कसं आणता येईल यासाठी एक अभ्यास समिती स्थापन करावी, जेणेकरून शासकीय तिजोरी वेगाने भरेल!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Rohit Pawar X Post
आमदार रोहित पवार यांची एक्सवरील पोस्ट

नितीन गडकरी काय म्हणाले?

नितीन गडकरी यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “काही प्रसारमाध्यमे दुचाकी वाहनांवर टोल कर आकारणीबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवत आहेत. असा कोणताही निर्णय प्रस्तावित केलेला नाही. दुचाकी वाहनांना टोलमधून सूट आहे जी पूर्णपणे यापुढेही सुरू राहील. सत्यता पडताळून न पाहता खळबळ निर्माण करण्यासाठी दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवणे हे चांगल्या पत्रकारितेचे लक्षण नाही. मी या सगळ्याचा निषेध करतो.”