Rohit Pawar on Ajit Pawar vs IPS Row: करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांना मुरूम उत्खननाची कारवाई रोखण्यासाठी फोनवरून सांगितल्याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका होत आहे. विरोधकांनी अजित पवारांना या प्रकरणावरून लक्ष्य केले आहे. शिवसेनेने (ठाकरे) तर त्यांचा राजीनामाही मागितला आहे. महायुतीमधून भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे वगळता अद्याप कुणीही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र अजित पवार यांच्यावर एरवी खरपूस टीका करणारे त्यांचे पुतणे आणि शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी मात्र यावेळी अजित पवारांची बाजू उचलून धरली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवारांनी काकांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली असून मित्रपक्षांकडून अजितदादा टार्गेट झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

राज्यात शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसाने झालेलं नुकसान असे अनेक प्रश्न आहेत पण त्यावर चर्चा होण्याऐवजी सध्या करमाळा येथील महिला पोलिस अधिकारी आणि मा. अजितदादा यांच्यातील संभाषणाचीच अधिक चर्चा होताना दिसत आहे, असे रोहित पवार यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले.

ते पुढे म्हणाले, “वास्तविक अजितदादा सहज बोलले तरी ते रागावले, संतापले असं त्यांना भेटणाऱ्या नवख्या माणसाला वाटते. पण अजितदादांची कार्यपद्धती, स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा गेली ३५-४० वर्षे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.”

मित्रपक्षांकडूनच टार्गेट करण्याचा प्रयत्न

“करमाळा प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्याचीही कोणतीही चूक नाही. पण अजितदादांच्या फोन कॉलमधील संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळे वळण देऊन मित्रपक्षांकडूनच टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. आम्ही विरोधात असलो तरी माझा स्वभाव हा कायम खऱ्याला खरे म्हणण्याचा आहे, त्यामुळे आपल्याच मित्रांकडून कसा सापळा रचला जातो, हेही अजितदादांनी यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे. आम्ही मात्र नको त्या वादात तेल न घालता खऱ्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधत राहू”, असेही रोहित पवार म्हणाले.

अजित पवारांनी काय स्पष्टीकरण दिले?

या प्रकरणाचा वाद पेटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता”, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढे म्हणाले, “आपल्या पोलीस दलाबद्दल तसेच धैर्याने आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचे राज्य हेच सर्वात महत्त्वाचे आहे.”

राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांची मात्र टीका

शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी अजित पवारांची बाजू घेतली असली तरी त्यांच्याच पक्षाच्या जितेंद्र आव्हाड यांनी मात्र अजित पवारांवर टीका केली आहे. अजित पवारांचा फोन कॉल हा सत्तेची मग्रुरी दाखविणारा आहे. अजित पवारांची बोलण्याची ती स्टाईल आहे. या स्टाईलवर त्यांचे आजवर चालत आहे आहे. खरे तर त्यांनी महाराष्ट्रातल्या पोलीस दलाची माफी मागितली पाहिजे. मंत्रिमंडळात इतकी वर्ष राहिलेला एक माणूस आयपीएस अधिकाऱ्याला ‘तू’ म्हणण्यापर्यंत मजल मारतो, हे कळण्यापलीकडे आहे. एका वाळू चोरासाठी कोणत्या पातळीपर्यंत जायचे, याचा विचार करायला हवा.