राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एक मंत्रिपद त्यासोबतच विधानपरिषदेची एक जागा मिळावी, अशी मागणी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज विधानभवन परिसरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आगामी महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात काही जागा रिपब्लिकन पक्षाला मिळाव्यात, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

सर्व काही घटनाबाह्य करायचं आहे का? विचारणाऱ्या आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले “काही लोक…”

खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच असून न्यायालयाचा निकाल त्यांच्याच बाजुने लागेल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. विधानभवन परिसरात आज विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये झालेल्या राड्यावरही आठवले यांनी भाष्य केलं. “हे बिहार किंवा उत्तर प्रदेश नाही. महाराष्ट्रातील राजकारण नितीमत्तेवर चालतं, दादागिरीवर नाही”, असे आठवले यावेळी म्हणाले. विधिमंडळांच्या पायऱ्यांवरील विरोधकांच्या आंदोलनाला त्यांनी विरोध दर्शवला. विधानभवन परिसरात गोंधळ घालणाऱ्या आमदारांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली.

बिहारमध्ये ‘महागठबंधन सरकार’वर शिक्कामोर्तब! मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

दरम्यान, आज अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. सत्ताधाऱ्यांनी शिविगाळ केल्याचा आरोप करत मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. “विरोधीपक्ष म्हणून सरकारला जाब विचारणं, हे आमचं काम आहे. त्यामुळे त्यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? आम्ही “५० खोके, एकदम ओक्के” बोललो की यांच्या जिव्हारी लागतं” अशी प्रतिक्रिया या राड्यानंतर अमोल मिटकरी यांनी दिली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच महाविकासआघाडीकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे.