महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केलेल्या भाषणात चौफेर फटकेबाजी केली आहे. एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारसह सध्याच्या राजकीय स्थितीवर त्यांनी भाष्य केलं आहे. “माझ्या आजोबांचा, बाळासाहेब ठाकरेंचा विचार मला पुढे न्यायचा आहे. माझ्याकडे निशाणी असली काय, नसली काय.. नाव असलं काय, नसलं काय.. याने मला काही फरक पडत नाही. माझ्याकडे सगळ्यात मौल्यवान गोष्ट कुठली असेल, तर ती म्हणजे त्यांचे विचार आहेत. मी त्यांचे विचार पुढे घेऊन जात आहे, असं विधानही राज ठाकरे यांनी केलं आहे.

यावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी राज ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे. राज ठाकरे हे त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वाटेवर जात नसून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) वाटेवर जात आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या आजोबांनी लिहिलेली पुस्तकं वाचावीत, असा सल्लाही सचिन खरात यांनी दिला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत ही टीका केली आहे.

हेही वाचा- ‘एक महिन्यानंतर शरद पवारांना कंठ फुटला” अतुल भातखळकरांची खोचक टीका, म्हणाले…

संबंधित व्हिडीओत सचिन खरात म्हणाले की, “राज ठाकरे यांचं भाषण राज्यातील सर्व जनतेनं पाहिलं आहे. त्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय पुरुषांची नावं घेतली, राज्यातील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना कोणत्या भाषेचा वापर केला… हेही राज्यातील जनतेनं पाहिलं आहे. ते भाषणात म्हणाले की मला कोणत्याही निशाणीची गरज नाही. मला माझ्या आजोबांचे म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जायचे आहेत. राज ठाकरे तुम्हाला खरंच प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जायचे असतील तर पहिल्यांदा त्यांनीच लिहिलेलं ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे” हे पुस्तक वाचावे.”

हेही वाचा- “भाजपाची तळी उचलून…” राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावरून अंबादास दानवे यांचा हल्लाबोल!

“पण राज ठाकरे आपण महाराष्ट्रात धार्मिक राजकारण करत आहात. आपल्याला प्रबोधनकार ठाकरे यांच्या वाटेवर जायचं नसून आपल्याला आरएसएसच्या वाटेवर जायचं आहे, हे महाराष्ट्रातील जनतेनं ओळखलं आहे. त्यामुळे राज्यातील जनता तुमच्यासोबत येणार नाही, हे ध्यानात ठेवा’ असंही सचिन खरात यावेळी म्हणाले.