रामदास आठवले यांच्या पत्नीही आमदारकीसाठी इच्छुक
दिगंबर शिंदे, सांगली
आर. आर. पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेल्या तासगाव- कवठेमहांकाळमध्ये आमदारकीसाठी तिघींमध्ये चुरस निर्माण झाली आहे. अर्थात दोघींना उमेदवारी मिळते की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पत्नीही येथून आमदारकीसाठी इच्छुक आहेत.
तासगाव-कवठेमहांकाळमध्ये वेगळीच गणिते मांडली जात आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे हेच पुढील आमदार असतील अशा घोषणा झालेल्या असताना खासदार संजयकाका पाटील यांच्या पत्नी ज्योतीताई पाटील यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. यासाठी शब्द खर्च करण्याची खासदारांची तयारी आहेच, पण याचबरोबर केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनीही या मतदार संघातून महायुतीच्या माध्यमातून मदानात उतरण्याची तयारी दर्शविल्याने येथील लढत लक्षवेधी बनत आहे. राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते.
तासगावमध्ये माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांना भाजपने उमेदवारी देण्याचा शब्द दिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना आबांनी पराभूत केले होते. त्यानंतर आबांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणूक िरगणातून माघार घेत आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना पुढे चाल दिली. मात्र आता ती स्थिती राहिली नसल्याने राजकीय पक्षांनी मोच्रेबांधणी सुरू केली आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सेना-भाजपने युतीच्या माध्यमातून एकत्र निवडणूक लढविली त्यावेळी ही जागा शिवसेनेच्या वाटय़ाला होती. मात्र गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्याने जागा वाटपाचा मुद्दाच उपस्थित झाला नव्हता,
यामुळे भाजपने घोरपडे यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची केली होती. मात्र ऐन निवडणुकीमध्ये तासगाव तालुक्यातून अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याने घोरपडे यांचा पराभव झाला असल्याचा समज त्यावेळी पसरला होता. मध्यंतरीच्या काळात खासदार पाटील आणि घोरपडे यांच्यात वितुष्ट आले, याचे पडसाद जिल्हा बँक आणि बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळाले. तसेच जिल्हा परिषद निवडणुकीतही घोरपडे यांनी जुन्या विकास आघाडीच्या माध्यमातून आपला गट शाबूत ठेवण्याचे प्रयत्न केले. याच दरम्यान, कवठेमहांकाळ तालुक्यात आपला स्वतंत्र गट तयार करण्याचा प्रयत्न खासदारांनी केला. याला मर्यादित यश आले असले तरी घोरपडे गटाने आपले अस्तित्व पक्ष म्हणून कायम ठेवण्यापेक्षा विकास आघाडीच्या माध्यमातून आपली राजकीय कारकीर्द अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला. यासाठी प्रसंगी राजकीय विरोधक असलेल्या राष्ट्रवादीचीही साथ घेतली. कवठेमहांकाळ पंचायत समिती नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या वेळी याचे दृश्य परिणाम पाहण्यास मिळाले होते.
मे मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने नाराज घोरपडे यांची समजूत काढीत असताना विधानसभा निवडणुकीसाठी तासगावचे सहकार्य देण्याचा शब्द काकांच्या माध्यमातून दिला. मात्र विधानसभा निवडणुकीची हलगी वाजू लागताच तासगावमधून खासदारांच्या पत्नी ज्योतीताई पाटील यांना पुढे करून उमेदवारीची मागणी रेटण्यात येत आहे. समाज माध्यमातून सुमनताई आणि ज्योतीताई असा सामना रंगविण्यात येत असून यासाठी तासगावकरांनी उचल खाल्ली आहे.
तासगावमध्ये खासदार गटाचे समर्थन मिळाल्याविना तासगाव कवठेमहांकाळमध्ये घोरपडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर होत नाही, ही वस्तुस्थिती असल्याने याचाच लाभ घेत उमेदवारी पुढे रेटण्याचा प्रयत्न होत असून याला कवठेमहांकाळमधील कार्यकर्त्यांचाही पािठबा आहे हे दर्शविण्यासाठी चार दिवसापूर्वी एक मेळावाही कवठय़ात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात कार्यकत्रे उमेदवारी मागत आहेत, मात्र पक्ष देईल त्या उमेदवाराच्या मागे राहण्याची आपली भूमिका असेल, असे सांगत खासदारांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. यामुळे घोरपडे अस्वस्थ झाले आहेत. जर भाजपची उमेदवारी शब्द दिल्याप्रमाणे मिळाली तर खासदार गटाविना जीत हाताशी येणे अशक्य, आणि खासदार गट प्रामाणिक काम करेल याची शाश्वती काय, असा प्रश्न घोरपडे यांच्यापुढे उभा ठाकला आहे.
घोरपडे यांचाही राजकीय प्रवास वेगवेगळ्या मार्गाने झाला आहे. काँग्रेसला आव्हान देत अपक्ष, कधी काँग्रेसशी तर कधी राष्ट्रवादीशी घरोबा अशी वाटचाल राहिली आहे. यामुळे राजकीय विश्वासार्हता कशाशी खातात असा प्रश्न पडावा. तथापि, कवठय़ात आणि मिरज तालुक्याच्या पूर्व भागात एक स्वतचा गट जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे. लोकसभेवेळी शब्द देऊनही तो पाळायलाच हवा असे बंधन भाजप घालणार का, हाही प्रश्नच आहे. कारण खासदारांची जवळीक प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जास्त आहे. त्यात घोरपडे यांच्या भाजप प्रवेशासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आवर्जून उपस्थित होते. गडकरी गटाचे समजले जाणारे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपदाने अखेपर्यंत हुलकावणीच दिली यामागे दडलेले राजकारण लक्षात घेतले तर खासदार पत्नींची उमेदवारीची मागणी ही काही केवळ कार्यकर्त्यांची भावना आहे असे म्हणणे भाबडेपणाच झाला असे म्हणावे लागेल.
यातच केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनीही तासगावमधून महायुतीच्या माध्यमातून रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. श्रीमती आठवले यांचे माहेर सांगली असले तरी मंत्री आठवले यांचे मूळ गाव कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालेवाडीचे आणि त्यांचे आजोळ आबांच्या अंजनीच्या शिवेवर असलेले सावळज. या जोरावर श्रीमती आठवलेही भवितव्य अजमावण्याच्या प्रयत्नात असल्या, तरी हा बार फुसकाही ठरू शकतो.