जमीन ही आता धनिकतेचे प्रतीक झाली आहे. शेतकऱ्यांचे जीवन जगण्याचे साधनच लुटले जात आहे. जमीन लुटीचे राजकारण करणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते हे एकाच माळेचे मणी असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी केली.
 बीड लोकसभा मतदारसंघाचे आम आदमी पक्षाचे उमेदवार नंदू माधव यांच्या प्रचारार्थ शनिवारी बीड येथे मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत सभा झाली. यावेळी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष कालिदास आपेट, अमर हबीब, संदीप मेहता, विजय शर्मा, अ‍ॅड. कीर्ती कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना पाटकर म्हणाल्या, शेतकऱ्यांचे कल्याण व्हावे म्हणून सहकारी चळवळ सुरू झाली. मात्र सहकारी साखर कारखाने वेगवेगळ्या कारणांनी बंद पाडून ते कमी किमतीत विकत घेण्याची स्पर्धा सुरू आहे. कारखान्याच्या जमिनीवर यांचा डोळा आहे. शेतीमालास योग्य भाव न देता शेती परवडत नाही, असे म्हणून जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत. त्यातूनच १८० लाख हेक्टर जमीन अकृषी करण्यात आली. हे कारस्थान करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. त्यामुळे नव्या दमाच्या तरुणांसह आम आदमी पक्ष पुढे आला आहे. नंदू माधव हा सामाजिक चळवळीतील कलावंत निवडणुकीस उभा आहे. त्यास निवडून द्या, असे आवाहन पाटकर यांनी या वेळी केले.