रमेश पाटील

वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या परळी प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात येणार आहे. राज्य शासनाने तसा निर्णय घेतला असून या निर्णयाने परळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या आदिवासी -दुर्गम भागाला चांगली आरोग्यसेवा मिळणे शक्य होणार आहे.

परळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ५५ ते ६० गावे व अनेक पाडे येतात. या सर्व गावपाडय़ांची लोकसंख्या ही ६० हजारांहून अधिक आहे. आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या आदिवासी भागामध्ये सर्वाधिक कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण आहे. त्याचप्रमाणे साथीचे आजार, सर्पदंशाचे प्रमाण अधिक असल्याने रुग्णांना उपचारासाठी वाडा अथवा ठाणे, मुंबईला जाणे भाग पडत होते. या आदिवासी भागासाठी ग्रामीण रुग्णालयाची नितांत अवश्यकता  होती. म्हणून या परिसरात ग्रामीण रुग्णालयाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती.

विधिमंडळाच्या अनुसूचित जनजाती समितीचे तत्कालीन  अध्यक्ष आमदार रुपेश म्हात्रे यांनी परळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून ग्रामीण रुग्णालय करण्याची शिफारस राज्य सरकारला केली होती. त्यावर तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडेही अनेक बैठका झाल्या होत्या. दरम्यान आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाला मान्यता दिल्याने लवकरच परळी येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय निर्माण होणार असल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

दरम्यान परळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत सोनाळे येथे आरोगय पथक असून या ठिकाणी बाह्य़ व अंतररुग्ण मोठय़ा संख्येने येतात. सोनाळे या ठिकाणी परळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलंतरित करून या भागाला न्याय द्यावा, अशी मागणी सोनाळा परिसरात येणाऱ्या २२ गावांतील नागरिकांनी केली आहे.

वाडा ते इगतपुरी (नाशिक) या दोन तालुक्यांच्या १०० किलोमीटर परिसराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे ग्रामीण रुग्णालय होत आहे. या भागात बहुसंख्येने राहत असलेल्या आदिवासींसाठी ही आनंदाची बाब आहे.

– वैभव पालवे, मांगळूर (परळी) रहिवासी

परळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा ही परळी विभाग शिवसेनेची गेल्या अनेक वर्षांंपासूनची मागणी होती. उशिरा का होईना आमच्या मागणीची शासनाने दखल घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– रोहिदास शेलार, जिल्हाध्यक्ष भारतीय विद्यार्थी सेना