​सावंतवाडी: आधुनिक काळात नात्यांना आणि परंपरांना टिकवून ठेवणे आव्हानात्मक झाले असताना, सावंतवाडीजवळील माजगाव गावात सावंत कुटुंबियांनी आपल्या मूळ पुरुषाने दिलेला शब्द ११ पिढ्यांहून अधिक काळ जपला आहे. ‘सात-सावंतांचा गणपती’ म्हणून ओळखला जाणारा हा उत्सव केवळ ४५ कुटुंबांचाच नव्हे तर ५०० हून अधिक सदस्यांचा एकत्रित जल्लोष बनला आहे. विशेष म्हणजे, मामा-भाच्यांच्या नात्यावर आधारित हा अनोखा गणेशोत्सव आजही त्याच उत्साहाने साजरा होतो, जिथे एकाच मंडपात दोन्ही कुटुंबांचा गणपती बसवला जातो.

मामा-भाच्यांची अनोखी परंपरा:

​या परंपरेची सुरुवात या घराण्याचे मूळ पुरुष असलेल्या सातू सावंत यांनी केली. त्यांच्या नावावरूनच या घराण्याला ‘सात सावंत’ असे नाव पडले. एका आख्यायिकेनुसार, सातू सावंत यांनी आपले भाचे तांबोळी येथील देसाई यांना धार्मिक अडचणी येऊ नये म्हणून माजगाव येथे स्थायिक केले. इतकेच नव्हे तर, त्यांनी आपल्या भाच्याला आपल्या गणपतीसोबत देसाई यांच्या मूर्तीची पूजा करण्याची परवानगी दिली. त्यामुळे, गेली ११ पिढ्या, दोन दैवते एकाच मंडपात एकत्र पूजली जातात. दररोजचा उपार (नैवेद्य) आणि आरतीचा साज आजही या उत्सवाला चैतन्य देत असतो.

गावातील सर्वांचे सहकार्य:

​या गणपतीची मूर्ती तयार करण्याची जबाबदारी गावातील कुंभार सांगवेकर कुटुंबाकडे होती. त्यांच्या सेवेबद्दल सावंत कुटुंबियांनी त्यांना गावातील जमीन बंबद्दल स्वरूपात दिली होती. तसेच, गणपतीसाठी रंग, तेल, वात देण्यासाठी नाटेकर नावाचे व्यापारी मदत करत असत. त्याचप्रमाणे, गणपतीसमोर नाचगाणे करणाऱ्या कलाकारांनाही जमिनी दिल्या होत्या, जेणेकरून ही परंपरा अविरत चालू राहील.

​कालांतराने ही पद्धत कालबाह्य झाली असली, तरी उत्सवाच्या उत्साहावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. १९६७ पासून सांगवेकर कुटुंबात कोणी कलाकार न उरल्याने सावंत कुटुंबातील काही सदस्यांनी स्वतः मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. आजही २१ गोळ्यांची मूर्ती घराण्यातील काका आणि तरुण वर्ग मिळून तयार करतात.

उत्सवातील काही वैशिष्ट्ये;

​पारंपरिक मूर्ती आणि विसर्जन: पूर्वी अवाढव्य आणि अवजड गणेशमूर्ती उत्सव मंडपात आणणे आणि विसर्जनासाठी एक किलोमीटर दूर महादेव मंदिराच्या तलावापर्यंत घेऊन जाणे हे मोठे शक्तीचे काम होते. त्यावेळी सुमारे २० ते २५ सशक्त जवान खांद्यावर मूर्ती घेऊन ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात मिरवणूक काढत असत. आता यासाठी आधुनिक रथाचा वापर केला जातो.

​आर्थिक बचत: आज ४५ स्वतंत्र कुटुंबांचा हा उत्सव आहे आणि प्रत्येक कुटुंबाने उत्सवासाठी एक निश्चित वर्गणी ठरवली आहे. यामुळे प्रत्येक कुटुंबाचा वार्षिक खर्च सुमारे १० ते १२ हजार रुपयांनी वाचतो, ही एक समाधानाची बाब आहे.

​कुटुंबप्रमुखांची परंपरा: पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असलेल्या या कुटुंबाचे प्रमुख राघ अर्जुन सावंत होते. त्यांच्या नंतर काकू सावंत, रामचंद्र सावंत, वामन सावंत आणि के. व्ही. सावंत यांनी ही जबाबदारी सांभाळली. सध्या माजगाव हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. के. सावंत हे घराण्याचे प्रमुख म्हणून मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांच्या सल्ल्यानुसार सर्व कार्यक्रम पार पाडले जातात.

​या उत्सवाने केवळ एक धार्मिक परंपराच नाही तर, एकत्रित राहण्याची आणि नाती जपण्याची एक शिकवण दिली आहे.