‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेतलं आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब यांना अटक केल्यानंतर यावरुन आता विरोधी पक्ष असणाऱ्या भाजापाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मात्र या प्रकरणामध्ये पोलिसांच्या कारवाईचे समर्थन करताना काँग्रेसने या प्रकरणाचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. हे प्रकरण गुन्हेगारीशी संबंधित आहे, असंही काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. रायगड-अलिबाग पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना दिलेल्या उत्तराचे पत्रही सावंत यांनी ट्विट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> अर्णब गोस्वामी अटक : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं आहे तरी काय, जाणून घ्या

मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना पोलिसांनी पाठवलेल्या पत्राचा फोटो सावंत यांनी ट्विट करत, “यावरुन अर्णब गोस्वामींविरोधात करण्यात आलेली कारवाई ही पूर्णपणे कायदेशीर आहे हे स्पष्ट होत आहे,” असं म्हटलं आहे. तसेच “या प्रकरणाचा पत्रकारितेशी काहीही संबंध नाही. आत्महत्येच्या चिठ्ठीमध्ये नाव असल्याने या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी व्हायला हवी मात्र फडणवीस सरकारने ती होऊ दिली नाही,” असं म्हटलं आहे.

सावंत यांनी ट्विट केलेलं पत्र १५ ऑक्टोबर रोजी पाठवण्यात आल्याचे त्यावरील तारखेवरुन स्पष्ट होत आहे. या पत्रामध्ये पोलीस संबंधित प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती रायगड-अलिबागमधील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक जे. ए. शेख यांनी अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना दिली आहे. यावरुन या प्रकरणाचा तपास मागील अनेक दिवसांपासून सुरु होता असं सावंत यांना निदर्शनास आणून द्यायचे असल्याचे स्पष्ट होते.

या ट्विटच्या आधी सावंत यांनी यांच प्रकरणावर अन्य एका ट्विटमधूनही भाष्य केलं आहे. अर्णब यांना अटक झाल्यानंतर धन्यवाद महाविकास आघाडी सरकार असं म्हणत सावंत यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले. त्याचबरोबरच त्यांनी #JusticeForAnvayNaik हा हॅशटॅगही वापरला आहे. “अन्वय नाईकला न्याय मिळवून दिल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारला धन्यवाद,” असं सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सावंत यांच्याबरोबरच अनेक काँग्रेस समर्थकांनी #JusticeForAnvayNaik हा हॅशटॅग वापरुन ट्विट केलं आहे. अनेकांनी या प्रकरणामध्ये मागील काही दिवसांत पोलिसांनी केलेल्या तपासाच्या बातम्यांचे फोटोही ट्विट केले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin sawant says action on arnab goswami is legal fadnavis govt not allowed fair inquiry scsg
First published on: 04-11-2020 at 12:08 IST