काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या बड्या दरोडेखोरांना आम्ही बाजूला सारून आता छोट्या चोरांना छाताडावर बसवले आहे. त्यामुळे सरकार बदलले म्हणजे आपले भले होईल या भ्रमात कोणीही राहू नका, आम्हीही राहणार नाही अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आपल्या मित्रपक्ष भाजपवर केली आहे.
नवे सरकार शेतकऱयांचे प्रश्न सोडवेल अशी आशा होती म्हणून साथ दिली. शेतकऱयांबाबत ते काय करताहेत ते पाहूया नाहीतर रस्त्यावर आपला मार्ग मोकळा असल्याचा इशारा देखील खोत यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने श्रीरामपूर येथे ऊस व दूध परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी खोत बोलत होते.
सदाभाऊ खोत यांच्यासोबत खासदार राजू शेट्टींसह अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते.
सदाभाऊ खोत म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षात आघाडी सरकार विरोधात स्वाभिमानीने आंदोलन केले. दहा हजार कार्यकर्ते तुरुंगात गेले. आघाडी सरकारला हाणून पाडले तरीही सरकार बदलले म्हणजे आपले भले होईल या भ्रमात तुम्ही राहू नका, आम्हीही त्या भ्रमात राहणार नाही. सध्या मधला मार्ग म्हणून एकच काम केले आहे ते म्हणजे, मोठ्या दरोडेखोरांना बाजूला करून छोट्या चोरांना छाताडावर बसवले आहे, असेही खोत म्हणाले. तर, ऊस दराबाबत येत्या २५ तारखेपर्यंत सरकारने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. तसेच अलिबागच्या मेळाव्यात शेतकऱ्यांविषयी इतका कळवळा दाखवून बोलणारे शरद पवार शेतकऱ्यांवर अन्याय करणारे त्यांचे खासदार विजयसिंग मोहिते पाटील यांच्यावर कारवाई का करत नाहीत, असा सवालही शेट्टी यांनी यावेळी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sadabhau khot criticise bjp government
First published on: 20-11-2014 at 02:16 IST