एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला मंगळवारी ( २० जून ) एक वर्ष झालं. शिंदे-भाजपा सरकारचीही लवकरच वर्षपूर्ती होईल. पण, अद्याप सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने आमदार आणि घटकपक्षही नाराज झाले आहेत. ‘सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार करण्याची क्षमता नाही,’ असं म्हणत आमदार बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीसांना घरचा आहेर दिला आहे. अशातच रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
“भाजपाला घटकपक्षाची अद्यापही आठवण झाली नाही. प्रत्येकाची वेळ येते. आम्ही वाट पाहतोय,” असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा : “…तर एकनाथ शिंदेंनी गोळी झाडून घेतली असती,” दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा
“…हे अद्याप समजलं नाही”
“सरकारबरोबर रासप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिवसंग्राम आणि रयत क्रांती संघटना असे चार घटकपक्ष आहेत. आमचं सरकार आलं. पण, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना घटकपक्षांची आठवण झाली नाही. बैठक बोलवायची की अजून आमचा नंबर आला नाही, हे अद्याप समजलं नाही,” असं सदाभाऊ खोत म्हणाले.
“आम्ही म्हणतोय भाजपाबरोबर आहे”
“आम्ही म्हणतोय भाजपाबरोबर आहोत. ते म्हणाले नाहीत, तुम्ही आमच्याबरोबर आहात. मात्र, आम्ही म्हणतोय भाजपाबरोबर आहे. प्रत्येकाची वेळ येते. तेव्हा प्रत्येकाला संधी मिळत असते. आम्ही वाट पाहतोय,” असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.
हेही वाचा : “नोटीस आल्यावर मोदींची भेट घेतली”, एकनाथ शिंदेंच्या दाव्यावर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “रोज…”
“मंत्रिमंडळ विस्तार २०२४ नंतरच होणार”
मंत्रिमंडळ विस्तारावरून बच्चू कडू यांनीही सतत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी ( २० जून ) प्रसारमाध्यमांना बोलताना बच्चू कडू म्हणाले, “मंत्रिमंडळ विस्ताराला एक वर्ष लागणार नाही, असं वाटत होते. पण, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. ते दुर्दैवी असलं, तरी काही काम चांगली झाल्याने मंत्री केलं म्हणून नाराज नाही. मी नेहमी सांगतो, मंत्रिमंडळ विस्तार २०२४ नंतरच होणार आहे. ती क्षमता सध्या सरकारमध्ये नाही.”