अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ गळ्यात पाडून घ्यायला चारही उमेदवार उत्सुक असले तरी निवडणुकीदरम्यान कुठलेही आरोपप्रत्यारोप न करता त्यांचा प्रचार संयमाने सुरू आहे. मात्र, हा प्रचार शेवटच्या टप्प्यात कोणते वळण घेईल, हे आताच सांगणेअवघड आहे.  
एकूण १०६९ मतदार संमेलनाच्या अध्यक्षाची निवड करणार आहेत. त्यापैकी प्रत्येक घटक संस्थेचे प्रत्येकी १७५ मतदार, निमंत्रित संस्थेचे ८५ मतदार, समाविष्ट पाच संस्थांचे प्रत्येकी ५० मतदार, संलग्नित संस्थेचे ११ मतदार, हयात असलेल्या माजी संमेलनाध्यक्षांची १४ मते आणि महामंडळाने स्थापन केलेल्या कोषागाराच्या विश्वस्तांची नऊ मते अशी मतदारांची वर्गवारी आहे. माजी संमेलनाध्यक्षांमध्ये आजच्या घडिला वसंत आबाजी डहाके, राजेंद्र बनहट्टी, प्रा. द.मा. मिरासदार, मधु मंगेश कर्णिक, डॉ. रा.ग. जाधव, मारुती चितमपल्ली, डॉ. द.भि. कुळकर्णी, के.ज. पुरोहित, उत्तम कांबळे, डॉ. विजया राजाध्यक्ष, म.द. हातकणंगलेकर, डॉ. अरुण साधू, डॉ. यु.म. पठाण इत्यादी माजी संमेलनाध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले अशा १४ अध्यक्षांना मतदानाचा अधिकार आहे. उपरोक्त मतदारांपैकी बहुतेकांना मतपत्रिका मिळाली आहे. अनेकांनी महामंडळाला त्या पाठवूनही दिल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
माजी संमेलनाध्यक्षांपैकी एकमेव महिला संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. विजया राजाध्यक्ष यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यानंतर बऱ्याच वर्षांपासून महिला संमेलनाध्यक्ष झालेली नाही. ही सहानुभूती साहजिकच प्रभा गणोरकर यांच्या बाजूने आहे. शिवाय गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच संमेलनाध्यक्ष म्हणून महिलांची संख्या नगण्य असल्याचे म्हटले होते. त्यामुळे पवार यांचे भाष्य गणोरकर चाहत्यांच्या पथ्यावरच पडल्याने त्या निवडून येतील, अशी शक्यता त्यांच्या समर्थकांना वाटते. मात्र, फ.मु. शिंदे यांचा मित्र परिवारही विदर्भात आहे आणि चांगल्याप्रकारे प्रचार करतो आहे. अगदी प्रभा गणोरकरांना अनुमोदन देणारेही फ.मु. शिंदे यांच्या नागपूर भेटीदरम्यान शिंदे यांच्या आदरतिथ्यात दोन-तीन दिवस होते, हे विशेष.
माहितीपत्रक, एसएमएस, प्रत्यक्ष भेटीगाठी, दूरध्वनी एवढेच नव्हे तर फेसबुकच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. गणपतीमध्ये मग्न असलेल्या मतदारांच्या भेटीगाठी उमेदवारांना घेता आल्या नव्हत्या. मात्र तेव्हा थंडावलेल्या प्रचाराने आता वेग घेतला आहे. स्वत: डॉ. गणोरकर बृहन्महाराष्ट्रात निवडणूक प्रचारात गुंतल्या आहेत. हैदराबाद, गुजरात, भोपाळ, इंदूर, गोवा इत्यादी ठिकाणी त्या जाऊन आल्या आहेत. त्यांच्या मते, निवडणूक संपेपर्यंत प्रचार संपत नाही. फोन आणि एसएमएस करून नियमित प्रचार सुरू आहे.