बिहारमधील महाबोधी विहारात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर शिर्डी येथील साईबाबा मंदिर व परिसराचे केंद्रीय व राज्य गुप्तवार्ता विभाग तसेच दहशतवादविरोधी पथक (एटीएस ) या तीन यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतेच सुरक्षा ऑडिट केले. तीन दिवस हे काम सुरू होते. शिर्डीतील सुरक्षा व्यवस्थेचे प्रथमच अशा प्रकारे ऑडिट झाले आहे.
देशात कुठेही धार्मिक स्थळांवर दहशतवादी हल्ले झाल्यानंतर तातडीने शिर्डीत हाय अलर्ट देण्यात येतो. त्यानंतर सुरक्षा व्यवस्था काही काळात अत्यंत सतर्क केली जाते. नंतर मात्र शिर्डीची सुरक्षा व्यवस्था केवळ साईभरोसे असते. बिहारमधील महाबोधी विहारामधील बॉम्बस्फोटानंतर देशातील महत्त्वाच्या स्थळांबरोबरच शिर्डीतही सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. शिर्डीमध्ये दररोज लाखो भाविक येत असतात. गर्दीच्या काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी काय उपाययोजना करता येतील, यादृष्टीने काही बाबी सुरक्षा ऑडिटमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. सध्याच्या सुरक्षा यंत्रणेतील असणाऱ्या त्रुटींसंदर्भात संस्थान प्रशासन व पोलिसांना सूचना देण्यात येत आहेत. साई संस्थानने व्हेंटेज इंटिग्रेटेड सिक्युरिटी सोल्युशन या कंपनीमार्फत मंदिरातील २० व दर्शनरांगेतील १६ कॅमेऱ्यांसह प्रवेशद्वार आणि परिसरात जवळपास १०१ सीसीटीव्ही बसविले आहेत. विशेष म्हणजे यातील १० कॅमेरे फेस डिटेक्शन कॅमेरे असून यात गुन्हेगार, पाकीटमारांची आधीचे छायाचित्रे आहेत. यातील गुन्हेगार मंदिर परिसरात येताच नियंत्रण कक्षात भोंगा वाजतो. तातडीने वॉकी टॉकीवरून संबंधित ठिकाणच्या सुरक्षारक्षकाशी संपर्क करून गुन्हेगाराला तातडीने पकडणे शक्य होते. या यंत्रणेच्या माध्यमातून आतापर्यंत २५०हून अधिक पाकीटमारांना पकडण्यात आले आहे.
सुरक्षा यंत्रणेची कमतरता, समाधी मंदिर व परिसराच्या बाहेर सुरक्षेसाठी काय उपाय योजना करायच्या, तसेच संस्थानच्या सुरक्षारक्षकांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण, भविष्यात होणारी अनुचित घटना टाळण्यासाठी शक्य तेवढे उपाय याबाबत सुरक्षा ऑडिटमध्ये शिफारशी करण्यात येणार आहेत. सध्या मंदिर व परिसराच्या सुरक्षेसाठी तीन शिफ्टमध्ये ४४ पोलीस, ७ शीघ्र प्रतिसाद दल, १६० साईसंस्थान कायम कर्मचारी, १०४ सुपर सिक्युरिटी, ११५ इगलआय व जवळपास ३० रक्षक असे ४५०हून अधिक सुरक्षारक्षक मंदिर व परिसराची सुरक्षा सांभाळत आहेत. यात पोलिसांकडे अत्याधुनिक शस्त्रे देण्यात आली आहेत. शिर्डीसाठी स्वतंत्र बॉम्बशोधक पथक व श्वानासह ७ कर्मचारी या पथकात कार्यरत आहेत. या श्वान पथकामार्फत समाधी मंदिर व परिसराची दररोज तपासणी केली जाते.