राज्यातील प्रमुख मीठ उत्पादक जिल्हा म्हणून रायगड जिल्ह्य़ाची ओळख होती. आज मात्र ही ओळख नामशेष होत चालली आहे. शासनाचे उदासीन धोरण आणि मीठ व्यवसायिकांसमोरील अडचणी यामुळे मिठागर व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. मिठागर व्यवसायाला पोषक अशा धोरणाची मागणी मीठ उत्पादकांकडून केली जात आहे.
रायगड जिल्ह्य़ात एकेकाळी दरवर्षी जवळपास ३० हजार टन मिठाचे उत्पादन घेतले जात होते. आज हे उत्पादन घटून केवळ ३ हजार टनावर आले आहे. मीठ उत्पादनाखालच्या क्षेत्रात सातत्याने घट होत गेल्याने आणि मिठागर व्यवसायिकांसमोरील अडचणींमध्ये वाढ झाल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. रायगड जिल्ह्य़ातील उरण, पेण आणि महाड या तीन तालुक्यांत प्रामुख्याने मिठागरे होती. यापैकी उरण तालुक्यात जेएनपीटी बंदर आल्यानंतर या परिसरातील मिठागर व्यवसाय जवळपास संपुष्टात आला, तर महाड तालुक्यातील मिठागरांच्या क्षेत्रातील उत्पादन फार पूर्वीच बंद पडले. त्यामुळे आता हा व्यवसाय केवळ पेण तालुक्यापुरता मर्यादित राहिल्याचे दिसून येत आहे.
पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील १२ हजार एकर क्षेत्रांत आजही मिठागरांचा व्यवसाय चालतो. मात्र गेल्या काही वर्षांत या मिठागर व्यवसायालाही उतरती कळा लागली आहे. मिठागर व्यावसायिकांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कामगारांची कमतरता, खाडी पट्टय़ात प्रदूषण आणि राज्य सरकारचे उदासीन धोरण यामुळे व्यवसायासमोरील अडचणीत भर घातली आहे. गेल्या दोन दशकांत धरमतर खाडी पट्टय़ात मोठय़ा प्रमाणात औद्योगिक कंपन्या आल्या आहेत. या औद्योगिक  कंपन्यांच्या प्रदूषणामुळे मीठ उत्पादनावर परिणाम झाल्याची माहिती मीठ उत्पादकांनी दिली आहे. पाण्यातील क्षारांचे प्रमाण घटल्याने मिठाचे उत्पादन कमी झाले आहे.
   मिठागर व्यवसायाला कामगारांची वानवा आहे. प्रचंड ऊन आणि खाऱ्या पाण्यात काम करावे लागत असल्याने गेल्या काही वर्षांत कामगारांनीही या व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे. मेहनतीच्या तुलनेत व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाण घटल्याने या मिठागर व्यवसायाचे अर्थकारण कोलमडले आहे. त्यामुळे आता अनेक पांरपरिक मीठ उत्पादकांनी आता मिठाचे उत्पादन घेणे बंद केले आहे.
कोकणात पूर्वी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्य़ांत मीठाचे उत्पादन घेतले जात असे. या मिठाचा वापर दैनंदिन खाण्याच्या वापरासाठी तसेच मत्स्यव्यवसायासाठी केला जात असे. आता मात्र या मिठाचा खाण्यासाठी होणाऱ्या वापरावर राज्य सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे चर्मोद्योग, मत्स्य व्यवसाय, विटभट्टी व्यवसाय आणि काही प्रमाणात बर्फ उद्योगासाठीच या मिठाचा वापर केला जातो आहे. याचा फटका मीठ उत्पादकांना बसला आहे.
गुजरातमध्ये मिठागराच्या व्यवसायाला पोषक वातावरण आहे. मिठावर प्रोसेसिंग करणारे अनेक प्रकल्प आज गुजरातमध्ये गेले आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये मिठागर व्यवसाय तेजीत आहे.
ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. कोकणातील मीठ हे खाण्याच्या वापरासाठी उपयुक्त नसले तरी इतर पूरक उद्योगांसाठी त्यांची मागणी प्रचंड प्रमाणात आहे. थोडे प्रोत्साहन या व्यवसायाला मिळाले तर मिठागर व्यवसायाला चांगले दिवस येऊ शकतील, अशी अपेक्षा पेण मीठ उत्पादक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब देव यांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salt farming in raigad descending
First published on: 02-09-2013 at 12:14 IST