लोकसत्ता वार्ताहर

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात विपुल प्रमाणात जैवविविधता, पशु पक्षी आणि जीवसृष्टी आहे त्यामुळे पर्यावरणीय संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो. सध्या वैभववाडी डोंगरात आग धुमसत असल्याने जीवसृष्टी, जैवविविधतेला धोकादायक बनले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा नैसर्गिक आणि ऐतिहासिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. यामध्ये वैभववाडी तालुक्यातील शिराळे, सालवा डोंगर यांचा समावेश होतो.वैभववाडीच्या मध्यभागी वसलेला, पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील आणि सात गावांचा रक्षणकर्ता असलेला सालवा डोंगर पर्यावरणीय व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या भाग आहे. दोन दिवसांपूर्वी येथील नाजूक परिसंस्था विनाशकारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे असे दिसून येते.

अशा दुर्मिळ पर्यावरणीय संपत्तीचे संवर्धन करण्याचे आवाहन आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाने आणि सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना यांनी केले आहे. काही वेळा नकळतपणे तर काही वेळा अज्ञात व्यक्तीकडून असे आगीचे प्रकार घडतात. या डोंगरातील घाबरलेले वन्यजीव घाबरून पळून जात आहेत आणि असंख्य दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी एकतर विस्थापित किंवा नष्ट होऊ शकतात.

सालवा डोंगराच्या अनेक नैसर्गिक खजिन्यांपैकी सेरोपेगिया अनंती ही एक दुर्मिळ वनस्पती प्रजाती आहे. ती या ठिकाणावरून प्रथम शोधली गेली आणि वर्णन केली गेली. सेरोपेगिया अनंतीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सालवा डोंगराचे वनस्पतिशास्त्रीय महत्त्व प्रचंड आहे. या अश्या वणव्या मुळे या सारख्या दुर्मिळ वनस्पती किंवा प्राणी यांना धोका होऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या भागात किंवा परिसरात सामुदायिक जागरूकता आणि प्रदेशाच्या अद्वितीय जैवविविधतेसाठी मजबूत संरक्षणाची तातडीची गरज असल्याचे मत वैभववाडी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व वनस्पती अभ्यासक आणि पर्यावरण संवर्धक डॉ.विजय पैठणे व सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे सचिव प्रा.श्री. एस. एन. पाटील यांनी व्यक्त केले आहे.