scorecardresearch

“आरएसएस आणि भाजपाकडून जबरदस्तीने लोकांचं धर्मपरिवर्तन”, अबू आझमींचा गंभीर आरोप, लव्ह जिहादचं अस्तित्वही नाकारलं

हिंदुत्वाच्या नावावर देशात नवीन संविधान लिहिलं जात असल्याचा अबू आझमींचा आरोप

“आरएसएस आणि भाजपाकडून जबरदस्तीने लोकांचं धर्मपरिवर्तन”, अबू आझमींचा गंभीर आरोप, लव्ह जिहादचं अस्तित्वही नाकारलं
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (संग्रहित छायाचित्र)

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी धर्मपरिवर्तनाच्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. आग्रा आणि अलिगढमध्ये झालेल्या धर्मपरिवर्तनाचा दाखल देत आरएसएस आणि भाजपाचे लोक जबरदस्तीने लोकांचं धर्मपरिवर्तन करत असल्याचा आरोप अबू आझमींनी केला आहे. नितेश राणे भाजपामध्ये आपलं महत्त्व वाढवण्यासाठी देशातील ८५ टक्के लोकांना मूर्ख बनवत असल्याची टीका देखील आझमी यांनी केली आहे.

“आमिष देऊन धर्मपरिवर्तन होत असेल तर…”; नगरमधील धर्मांतर प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान देशातील नागरिकाला वयाच्या १८ वर्षांनंतर धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकार देते, असेही आझमी यावेळी म्हणाले. हिंदुत्वाच्या नावावर या देशात ३० लोक भारताचे नवीन संविधान लिहित आहेत, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. “हिंदू धर्म प्रेम शिकवतो. मात्र, काही लोक या धर्माच्या नावावर द्वेषाचं विष पसरवत आहेत. ही लोकं हिंदू धर्मावर कलंक आहेत”, असा हल्लाबोल आझमींनी केला. देशातील लोकांनी जागृत झालं पाहिजे, संविधानाचं रक्षण केलं पाहिजे. अन्यथा आपल्या देशाची अवस्था देखील श्रीलंकेप्रमाणे होईल, अशी भीती आझमींनी यावेळी व्यक्त केली.

हिंदू मुलींचं धर्मपरिवर्तन करण्यासाठी ‘रेट कार्ड’, बाईक आणि पैसेही दिले जातात, नितेश राणेंचे विधानसभेत गंभीर आरोप

आझमी यांनी देशातील ‘लव्ह जिहाद’वर देखील भाष्य केलं. देशात लव्ह जिहाद नावाची संघटना असल्यास मी गुलाम बनायला तयार असल्याचे आझमी यावेळी म्हणाले. देवी-देवता, महापुरुष, धर्मग्रंथांची अवमानना करणाऱ्यांवर ‘मकोका’अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, हलालाबाबत चुकीची तथ्य पसरवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत लक्ष्यवेधीच्या माध्यमातून धर्मपरिवर्तनाचा मुद्दा मांडला होता. हिंदू मुलींचं धर्मांतर करण्यासाठी तरुणांना आर्थिक बळ दिलं जात असून, यासाठी ‘रेट कार्ड’ तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमिष देऊन धर्मांतरण होत असल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.