Sambhajiraje Chhatrapati : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर बोलताना हवेच्या वेगामुळे ही घटना घडली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी यावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं होतं. दरम्यान, माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनीही यावरून मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या या विधानाबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, हवेच्या वेगाचा विचार सरकारने आधी करायला हवा होता, अशी प्रतिक्रिया संभाजी राजे छत्रपती यांनी दिली.

हेही वाचा – ‘शिवद्रोही सरकारविरोधात मविआ आंदोलन पुकारणार’; उद्धव ठाकरे म्हणाले, “आता १ सप्टेंबर रोजी…”

नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आलं होतं. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी मी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून हा पुतळा नियमानुसार उभारला नसल्याचे सांगितले होते. आणि आता सात-आठ महिन्यांनी ही घटना घडली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. नियम धाब्यावर बसवून हा पुतळा का उभारण्यात आला, याचं उत्तर सरकारने द्यायला हवं”, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या विधानाबाबत विचारलं असता, “पुतळा कोसळण्याला हवेचा वेग जबाबदार असल्याचं सांगितलं जात आहे. पण हवेच्या वेगाचा विचार सरकारने आधी करायला हवा होता. आज हवेमुळे पुतळा कोसळला असं, तुम्ही म्हणू शकत नाही. ही पूर्णत: सरकारची जबाबरदारी आहे. राज्यात अनेक असे पुतळे आहेत, जिथे हवेचा वेग मालवण पेक्षा जास्त आहे. मात्र, तेथील पुतळे आजही सुरक्षित आहेत. त्यामुळे हवेमुळे पुतळा पडला, हे सरकारचं उत्तर होऊ शकत नाही. पुतळा उभारताना तो नियमानुसार उभारणं आणि त्याची देखभाल करणं, हे सरकारचं कर्तव्य आहे, अशा प्रकारे तुम्ही हात वर करू शकत नाही”, अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारलंही सुनावलं.

हेही वाचा – BJP VS Mahavikas Aghadi : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर राडा, ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नारायण राणेंचे समर्थक भिडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे बोलताना, “छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं, ही महाराष्ट्रासाठी अत्यंत शरमेची बाब आहे. असं व्हायला नको होतं. शिवाजी महाराज हे सर्वांचे आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी केवळ तुमच्या राजकारणासाठी अशाप्रकारे पुतळ्याचं लोकार्पण करणं योग्य नाही”, अशी प्रतिक्रियाही संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.