बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह सहा जणांना ‘एनसीबी’ने सबळ पुराव्याअभावी शुक्रवारी (२७ मे) निर्दोष सोडलं. ‘एनसीबी’ने न्यायालयात दाखल केलेल्या ६ हजार पानांच्या आरोपपत्रात आर्यन खानचा समावेश नाही. आर्यन खानने अमली पदार्थ बाळगल्याचा वा त्याचं सेवन केल्याचा कोणाताही पुरावा नसल्याचं ‘एनसीबी’ने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे क्रूझ ड्रग प्रकरणाचा तपास करणारे अमली पदार्थ विक्री नियंत्रण विभागातील (एनसीबी) तत्कालीन मुंबई प्रमुख समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

याप्रकरणी समीर वानखेडे यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्याचा आदेश केंद्र सरकारने (पंतप्रधान कार्यालय) केंद्रीय अर्थ मंत्रालयाला दिले असल्याचे समजते. त्यामुळे ‘एनसीबी’तून यापूर्वीच उचलबांगडी झालेल्या वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना समीर वानखेडे यांचं एक ट्वीट चर्चेत आलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमधून नकारात्मक गोष्टींकडे फारसं लक्ष देत नसल्याचं म्हटलं आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “मी नकारात्मक गोष्टींकडे फारसं लक्ष देत नाही. असं केल्याने तुम्ही प्रगतीच्या दिशेनं पुढे जाऊ शकत नाही. आपण नेहमी सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायला हवं. यामुळे आपलं आपल्या निवडींवर जसं नियंत्रण असतं, तसं आपणही नियंत्रणात राहतो.” समीर वानखेडे यांचं हे ट्वीट समाज माध्यमावर वेगानं व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरंतर, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ड्रग प्रकरणात आर्यन खान याला वानखेडे यांनी अटक केली होती. मात्र, वानखेडे यांनी क्रूझवर झालेल्या कारवाईचे चित्रण केले नाही, अटक केल्यानंतर आर्यन खान आणि इतर पाच जणांची अमली पदार्थाच्या सेवनासंदर्भातील रक्ताची नमुना चाचणी झाली नाही, साक्षीदारांच्या कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या, अशा तपासामध्ये अनेक त्रुटी राहिल्याचे ‘एनसीबी’ला आढळलं होतं. त्यामुळे क्रूझ ड्रग प्रकरणाचा चुकीच्या पद्धतीने व निष्काळजीपणे वानखेडे यांनी केलेल्या तपासाची सक्षम यंत्रणेकडून चौकशी केली जाणार आहे.