छत्रपती संभाजीनगर : पूर ओसरला, शासनाच्या मदतीचे पॅकेज जाहीर झाले. तत्पूर्वी नदीने प्रवाह बदलल्याची नोंद तशी प्रशासनाने फारशी घेतली नाही. पण मांजरा नदीला सात वेळा पूर येऊन गेला आणि गौर गावाच्या शिवारात वाळूच वाळू झाली. २०० एकरात पसरलेल्या वाळूने शेती पूर्णत: खरवडून गेली. आता माती कोठून आणायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. लातूर जिल्ह्यातील गौर नावाच्या गावात उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता काय करावे तेच सुचेनासे झाले आहे.
मांजरा नदीच्या काठी गौर गाव वसलेले. सहाशे घरांचा उंबरठा. पाच – साडेपाच हजार लोकसंख्या असणारे गौर हे गाव गेल्या दीड महिन्यापासून पूरग्रस्त आहे. सात वेळा पूर येऊन गेला. नदीपासून तीन किलोमीटरपर्यंतचा परिसर पाण्याखाली होता. ५०० एकर शेती पाण्याखाली. पाणी ओसरले आणि शेतकऱ्यांना कळले आपल्या शेतात आता फक्त वाळूच आहे. मांजरा नदीने प्रवाहच बदलला. आता शिवारात जाईल तिकडे फक्त वाळूंचे थर. चांगदेव सावंत यांच्या ऊस शेतीचं अस्तित्वही उरलं नाही.
गोविंद देशपांडे यांच्या शेतातील सोयाबीन वाहून गेलं. उरलेलं शेत वाळूच्या ढिगाऱ्याखाली. ही वाळू उपसायची कशी आणि त्यासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून, असा त्यांना प्रश्न पडला आहे. अरुण गिरी यांच्या जमिनीत मांजरा नदीचाच प्रवाह शिरला. नदीने दिशा बदलल्याने त्यांची जमिनी खरडवून गेली. ग्रामस्थांनी प्रशासनाला कळवल्यानंतर अधिकारी पाहणीसाठी आले.
‘नुकसान झालं आहे’ हे मान्य करून ते परत गेले. आता सांगितलं जात आहे ‘रान मोकळं करा, मनरेगातून काम मिळेल.’ शेतकऱ्यांकडे ना साधनं, ना पैसा. दिवाळीच्या तोंडावर वाळूचे डोंगर उपसण्यासाठी त्यांना नवी कसरत करावी लागत आहे. विविध योजनांसाठी सरकारला वाळू लागते. ही वाळूच सरकारने विकत घ्यावी आणि शेत दुरुस्त करून द्यावे, अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत.