हिंगोली : सेनगाव तालुक्यातील भानखेडा शिवारात उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवैध वाळू उपसा करणारे वाहन पकडल्यानंतर गुंडांनी ग्राम महसूल अधिकाऱ्यास मारहाण केली. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी सहा जणांवर सेनगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेनगाव ते येलदरी मार्गावर एका टिप्परमधून अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांना मिळाल्यानंतर गुरुवारी मध्यरात्री त्यांनी भानखेडा शिवार गाठले. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनास व चालकास पकडले. पकडलेले वाहन पोलीस ठाण्यात आणण्याच्या सूचना ग्राम महसूल अधिकारी अजय चोरमारे यांनी केल्या. उपविभागीय अधिकारी घुटुकडे यांचे वाहन पुढे अन् पकडलेले वाहन मागे धावत असताना अचानक एका मोटारमधून (एमएच-२६बीसी ९५६६) दोन जण तर दुसऱ्या वाहनातून (एमएच-३८-एडी ८०५९) नवनाथ राठोड व इतर खाली उतरले. त्यांनी टिप्पर थांबवून त्यामध्ये बसलेले ग्राम महसूल अधिकाऱ्यांना खाली खेचून दगडाने मारहाण केल्याने चोरमारे जखमी झाले तसेच शिवीगाळ केली.

गुरुवारी रात्री अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महसूलचे पथक प्रतिकार करू शकले नाही. त्यानंतर सहा जणांनी वाळूने भरलेले वाहन पळवले. ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चौघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तलाठी संघटनेने निषेध केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.