राज्यात वाळू तस्करांचा हैदोस अद्यापही सुरुच असून कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारावर त्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. उस्मानाबादच्या परांडा तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेवरुन राज्यात वाळू माफियांना कोणाचेही भय राहिलेले नसल्याने चित्र आहे. तहसीलदार अनिलकुमार हेळकर हे या हल्ल्ल्यात गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर बार्शीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

परांडा तालुक्यातल्या भोत्रा येथील खडके वस्ती येथे सीना नदीच्या पात्रात वाळूचे बेकायदा उत्खनन सुरु असल्याची माहिती परांडाचे तलसीलदार अनिलकुमार हेळकर यांना मिळाली होती. त्यानुसार, संबंधीतांवर कारवाईसाठी आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचलेल्या हेळकर यांच्या अंगावर वाळूने भरलेला ट्रॅक्टर घालत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये कंबरेवरुन ट्रॅक्टरचे चाक गेल्याने तहसीलदार हेळकर गंभीररित्या जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर त्यांना तातडीने बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुण्यात उपचारांसाठी हालवण्यात येणार आहे. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच बेकायदा काम सुरु असलेले तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. पुढील कारवाई महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.