मुंबईतील बीकेसी मैदानावरील शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू होईपर्यंत ६० टक्के लोक निघून गेल्याचा आरोप केला जातोय. लोक सभेतून निघून जातानाचे काही व्हिडीओही व्हायरल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना पत्रकारांनी विचारणा केली. त्यावर भुमरेंनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते शुक्रवारी (७ ऑक्टोबर) औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
संदीपान भुमरे म्हणाले, असं काहीही झालेलं नाही. सात ते आठ तास एकाच ठिकाणी बसल्यानंतर ते परत जागेवर येऊन बसले. हे असं चालूच असतं. मात्र, उठून जायचा काही संबंध नाही. उठून जायचं होतं, तर मग आलेच कशाला? ते इतक्या लांबून भाषण ऐकण्यासाठीच आले होते.”
“लोक सभेसाठी दुपारपासून खुर्च्यांवर बसलेली होती”
“एकनाथ शिंदेंची सभा नऊ वाजता सुरू झाली. लोक सभेसाठी दुपारपासून खुर्च्यांवर बसलेली होती. इतका मोठा जनसमुदाय होता की कोणी उठून जायचा संबंध नव्हता. मैदानात जितके लोक होते, तितकेच लोक मैदानाबाहेर होते,” असं संदीपान भुमरे यांनी यांनी म्हटलं.
“आम्ही शिवसेनेचे आहोत आणि एकनाथ शिंदे आमचे प्रमुख आहेत. आम्ही त्यांना प्रमुखच मानतो,” असंही भुमरेंनी नमूद केलं.
“खोके आणि गद्दार म्हटल्यानं आमचं महत्त्व कमी होणार नाही”
औरंगाबादमधील प्रश्नांवर बोलताना भुमरे म्हणाले, “औरंगाबाद शहरात पाच दिवसांनी पाणी येतं हे अगदी मान्यच आहे. ही परिस्थिती कोणामुळे झाली हेच आम्हाला सांगायचं आहे. त्यांनी पाणी, रस्ते, कचरा, वीज प्रश्नांवर बोललं पाहिजे. येऊन जाऊन ‘भुमरे गद्दार, प्रदीप जैसवाल गद्दार, खोके’ असंच बोलत असतात. हे बास झालं. तुम्हाला जनतेने नाकारलेलं आहे. त्यांनी खोके आणि गद्दार म्हटल्यानं आमचं महत्त्व कमी होणार नाही.”
हेही वाचा : “मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, पण त्यांनी…”, रामदास कदमांचा गंभीर आरोप
” बीकेसीचं मैदान शिवाजी पार्कपेक्षा दुप्पट”
“आमचं महत्त्व तुम्ही पाहिलं आहे. एकनाथ शिंदे शहरात आले तर मोठा जनसमुदाय जमा होतो. मुंबईतील बीकेसीचं मैदान शिवाजी पार्कपेक्षा दुप्पट आहे. कुणी हिंमत करत नाही. शेवटच्या माणसाला स्टेज दिसत नव्हतं, आम्ही दिसत नव्हतो. इतका जनसमुदाय जमला होता. आता हे काहीही टीका करत आहेत. माध्यमं खैरेंना महत्त्व देत आहेत. खैरेंना मातोश्रीवर विचारतही नव्हते,” असं म्हणत भुमरेंनी खैरेंवर निशाणा साधला.
