संगमनेर: शहरातील नामांकित संजीवन रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे संस्थापक, भाजपचे स्थानिक नेते डॉ. भानुदास डेरे यांनी कौटुंबिक वादातून अत्यंत धक्कादायक कृत्य केले. आपल्याच रूग्णालयाच्या प्रतीक्षा खोलीवर मोटर धडकवत तेथील कर्मचाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून डॉ. डेरे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, त्याच रुग्णालयात डॉक्टर असलेल्या मुलीने आपल्या विभक्त असलेल्या पत्नीला मदत केल्याचा राग आल्याने डॉ. डेरे यांनी आपले सहाय्यक सोमनाथ पवार यांच्यासह थेट फाॅर्च्युनर मोटर रुग्णालयाच्या प्रतीक्षा खोलीवर वेगाने धडकवली. तेथील काचेचा दरवाजा तोडला आणि एका कर्मचाऱ्याला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तो तरुण बचावला. डॉ. डेरे यांच्याच कन्या डॉ. एकता वाबळे यांनी वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांना गंभीर कलमांखाली अटक करण्यात आली आहे.

ही धक्कादायक घटना काल, मंगळवारी सायंकाळी संगमनेर येथील गुंजाळवाडी परिसरातील संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे घडली. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, डॉ. भानुदास डेरे आणि त्यांची पत्नी विभक्त राहतात. त्यांची कन्या डॉ. एकता वाबळे या आईला मदत करतात, तसेच त्या रूग्णालयाचे कामकाज पाहतात. याचा राग डॉ. डेरे यांच्या मनात होता. डेरे हे गेली अनेक वर्षे डॉ. वाबळे यांना धमक्या देऊन रुग्णालय खाली करण्यास भाग पाडत होते.

दि. १८ नोव्हेंबरला सायंकाळी डॉ. वाबळे दुसऱ्या मजल्यावर काम करत असताना, अचानक काचा फुटल्याचा मोठा आवाज आला. कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन डॉ. वाबळे यांना माहिती दिली. त्यांनी खाली येऊन पाहिलं असता, रुग्णालयाच्या प्रतीक्षा खोलीत पांढऱ्या रंगाची (एमएच. १७ डीजे. १४१९) क्रमांकाची फाॅर्च्युनर गाडी उभी होती. गाडीने प्रतिक्षालयाचा संपूर्ण काचेचा दरवाजा तोडला होता.

गाडीत आरोपी डॉ. डेरे व त्यांच्या शेजारी सहायक सोमनाथ पवार होता. डॉ. डेरे गाडीतून खाली उतरले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ते आयसीयू. कडे जाऊन आज एका-एकाला संपवतो असे ओरडू लागले. यावेळी पवार त्यांना प्रोत्साहन देत होता. डॉ. वाबळे यांनी आरडाओरडा केल्यानंतर रुग्णालयातील इतर कर्मचारी गोळा झाले. तेथे काम करणाऱ्या राजेंद्र अभंग यांनी गाडी वेगाने माझ्या अंगावर घेऊन मला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे डॉ. वाबळे यांना सांगितले. घटनेनंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी डॉ. भानुदास गेणूजी डेरे (रा. घोडेकरमळा, ता. संगमनेर) आणि सोमनाथ पवार यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून डॉ. डेरे यांना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.