संगमनेर : चारित्र्याच्या संशयातून एका ६५ वर्षीय पतीने आपल्या ६० वर्षीय पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घारगाव येथे घडली. पोलिसांनी पतीला अटक केली असून, न्यायालयाने त्याची एक दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
मृत महिलेचे नाव चंद्रकला दगडू खंदारे असून, आरोपी पतीचे नाव दगडू लक्ष्मण खंदारे आहे. तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे राहणारे दगडू खंदारे हे शेती व्यवसाय करत होते. काल, बुधवारी संध्याकाळी त्यांच्या कुटुंबाने नेहमीप्रमाणे एकत्र जेवण केले. जेवणाच्या वेळी दगडू खंदारे यांनी पत्नी चंद्रकला यांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांच्यासोबत वाद घालत शिवीगाळ केली. त्यांचा मुलगा भीमा खंदारे यांनी हस्तक्षेप करत वडिलांना शांत केले आणि दोघांनाही शेतातल्या घरात झोपायला पाठवले.
वडील शांत झाले आहेत की नाही हे पाहण्यासाठी मुलगा भीमा रात्री पुन्हा शेतातल्या घरी गेला. तिथे त्यांना त्यांची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. मात्र, वडील तेथे आढळून न आल्याने भीमा यांनी घारगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिली. दगडू खंदारे यांनी पत्नी झोपेत असताना तिच्या डोक्यात आणि मानेवर धारदार कुऱ्हाडीने अनेक वार केले. या हल्ल्यात चंद्रकला खंदारे यांचा जागीच मृत्यू झाला.
माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. भीमा खंदारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घारगाव पोलिसांनी आरोपी दगडू खंदारे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.