संगमनेर : जिल्हा पोलीसप्रमुखांच्या विशेष पथकाने संगमनेर शहरातील दोन मटका अड्ड्यांवर छापे टाकून मटका चालवणाऱ्या आणि खेळणाऱ्या एकूण ३५ लोकांवर कारवाई केली आहे. पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत ७ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
काही मटकाचालक राजकीय पक्षाशी निगडित असल्याची चर्चा आहे. संगमनेरमध्ये राजरोसपणे अवैध धंदे चालू असल्याचे या कारवाईतून अधोरेखित झाले. शिवाय पोलीस अधीक्षकांच्या पथकाने कारवाई केल्याने स्थानिक पोलिसांचे पितळ उघडे पडले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तेलीखुंट परिसरातील एका पत्र्याच्या खोलीतील मटका अड्ड्यावर छापा टाकून मटकापेढी चालकासह २९ जणांवर कारवाई करण्यात आली. छाप्यात पथकाने ७५ हजारांची रोकड, ९ मोटारसायकल, २२ मोबाइल संच आणि मटका खेळण्याचे साहित्य असा एकूण ७ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कॉन्स्टेबल आत्माराम पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
दुसऱ्या छाप्यात कोल्हेवाडी रस्त्यावरील मटकापेढीचालकासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी ५३ हजार ६६० रोख, आकडेमोड केलेल्या चिठ्ठ्या, ८ मोबाइल संच, ३ मोटारसायकल असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस शिपाई संतोष बाचकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.