संगमनेर : साकुर पठार भागातील वाडी- वस्त्यांना रस्ते, पाणी, आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांपासून जाणूनबुजून वंचित ठेवले गेले. येथील जनतेचा फक्त मतांसाठी वापर करून दहशत दाखवली गेली. परंतु आता कुणालाही घाबरू नका, कोणाच्या दबावाला आणि दहशतीला बळी न पडता महायुतीच्या पाठीमागे भक्कम उभे रहा, तालुक्यातील कुठलेही गाव विकासापासून वंचित राहणार नाही, असे आमदार अमोल खताळ म्हणाले आहेत.

तालुक्याच्या साकुर पठार भागातील हिवरगाव पठारअंतर्गत असणाऱ्या सुतारवाडी, शेंडेवाडीअंतर्गत सतीचीवाडी, गुंजाळवाडी पठार, मांडवे, शिंदोडी, बिरेवाडी, जांबुत येथील विविध विकासकामांची सुरुवात आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बाबासाहेब कुटे, बुवाजी खेमनर, गुलाब भोसले, किशोर खेमनर, रौफ़भाई शेख, इसाक पटेल, सुभाष पेंडभाजे, रवींद्र दातीर, सुभाष भुजबळ यांच्यासह विविध गावचे महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले, पठार भागातील सर्व मूलभूत प्रश्न मार्गी लावले जातील. विधानसभा निवडणुकीत माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले असेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वजण महायुतीच्या पाठीमागे भक्कम उभे राहा. शासनाच्या विविध योजनांचा भाग येथील खऱ्या आदिवासींना मिळाला पाहिजे यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सजग राहावे. अधिकाऱ्यांसोबत विविध शिबिरे घेऊन या भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांना शालेय दाखले, रेशनकार्ड, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मदत करावी.

तालुक्याच्या पठार भागात अनेकजण दहशत, दादागिरी करत जनतेला त्रास देण्याचे देत आहेत. त्यांचाही लवकरच बंदोबस्त केला जाईल. असे इशारा आमदार खताळ यांनी दिला. काहींनी याच पठार भागातील एक गाव २५ वर्षापासून दत्तक घेतले होते. मात्र या गावाचा विकास करता आला नाही, मग यांनी नेमका विकास केला तरी काय केला ? असा सवाल उपस्थित करत नुसती गावे दत्तक घेऊन गावांचा विकास होत नाही, त्याला जनतेची कामे करावी लागतात. जनतेने संपूर्ण संगमनेर तालुकाच मला दत्तक दिला आहे. त्यामुळे या तालुक्याचा विकास करणे ही माझी जबाबदारी आहे, हे मी माझ्या कामातून दाखवून देणार असल्याचा त्यांनी व्यक्त केला.

पठार भागात लवकरच औद्योगिक वसाहत

पठार भागातील तरुणांच्या हाताला काम मिळावे आणि बेरोजगारीचा प्रश्न सुटावा यासाठी साकुर पठार भागात औद्योगिक वसाहत सुरू केली जाईल. त्या माध्यमातून पठार भागातील तरुणांच्या हाताला काम मिळवून दिले जाणार असल्याचे आश्वासन आमदार खताळ यांनी दिले.