संगमनेर: विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे संगमनेर नगर परिषदेची निवडणूक ४० -४५ वर्षांनंतर प्रथमच चुरशीची, विशेषतः नगराध्यक्ष पदाची निवडणूक अधिक संघर्षमय ठरण्याची चिन्हे आहेत. मात्र अद्याप महायुती अथवा महाविकास आघाडीची घोषणा न झाल्याने मोठा संभ्रम आहे. आमदारकी शिंदे सेनेकडे असल्यामुळे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी शिंदे सेनेला मिळते, की सत्तेच्या राजकारणात येण्यासाठी भाजप प्रयत्न करतो, हे बघणेही औत्सुक्याचे ठरेल. दुसरीकडे काँग्रेसचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात आहे.
गेली चार साडेचार दशके नगरपालिकेवर काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. जनतेतून थेट नगराध्यक्ष पदाची निवड ज्या ज्यावेळी झाली, त्यावेळी विरोधकांनी काही अंशी आव्हान निर्माण केले, मात्र काँग्रेसने ते लीलया परतवून लावले. १५ वर्षे दुर्गाताई तांबे या संगमनेरच्या नगराध्यक्षपदी राहिल्या. आताही महिलेसाठी हे पद राखीव आहे. या निवडणुकीत दुर्गाताई तांबे उतरतात, की नव्या चेहऱ्याला संधी मिळते हे लवकरच स्पष्ट होईल. त्यांच्या स्नुषा आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली यांच्याही नावाची चर्चा आहे.
महाविकास आघाडीत संगमनेरमध्ये काँग्रेस सर्वांत तुल्यबळ आहे. त्या तुलनेत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अत्यंत कमकुवत आहेत. त्यातच ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आकारास येते की, वेगवेगळी निवडणूक लढवली जाते, हेही लवकरच स्पष्ट होईल.
थोरात गटाच्या वतीने आमदार सत्यजित तांबे यांनी धुरा खांद्यावर घेतली आहे. ते रणनीती आखत आहेत. अर्थात माजी मंत्री थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हेच उमेदवारांची अंतिम निवड करतील. माजी नगरसेवकांतील अनेक चेहरे जनतेच्या पसंतीस उतरणारे नाहीत, हेही त्यांना लक्षात घ्यावे लागणार आहे. इच्छुकांच्या मोठ्या संख्येमुळे उमेदवारांची निवड करताना कसरत होणार आहे. सोबतच अंतिम क्षणी फाटाफूट टाळण्याचे आव्हान थोरात गटासमोर असेल.
दुसरीकडे महायुतीतही सर्वकाही अलबेल नाही. मंत्री राधाकृष्ण विखे समर्थक अमोल खताळ यांनी ऐनवेळी शिंदे सेनेचे तिकीट मिळवत आमदारकी पटकावली. त्याअगोदर शिंदे सेनेची शहरात नगण्य ताकद होती. सहाजिकच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी शिंदे सेनेला मिळावी असे धुमारे फुटले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच मोठा भाऊ होता, त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी भाजपने दावा ठोकला आहे.
भाजपच्या राजकारणाचा पोत पाहता शहर, तालुक्याच्या सत्तेच्या राजकारणात घुसण्याची संधी ते सहजासहजी सोडणार नाहीत. त्यामुळे या दोन पक्षांच्या उमेदवारीवरून अंतर्गत संघर्ष लपलेला नाही. राष्ट्रवादी अजित पवार गट स्पर्धेत दिसत नाही. मात्र पूर्वीच्या तुलनेत महायुती अधिक सशक्त दिसत आहे. नगराध्यक्षपदासह सर्वच उमेदवारांची निवड मंत्री विखे आणि माजी खासदार सुजय विखे करतील हेही स्पष्ट आहे. तूर्तास काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी तांबे परिवारातून पुन्हा कोणी पुढे येते, की नवीन चेहऱ्याला संधी मिळते, यासह महायुतीचा उमेदवार कोण असेल ? बहुरंगी लढत होईल काय ? याची जोरदार चर्चा शहरात आहे.
