दिगंबर शिंदे

सांगली : भाजपमध्ये गट-तट अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगली दौऱ्यात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना दिला. यावरून भाजपचे वेगाने काँग्रेसीकरण झाल्याचे त्यांनी एकप्रकारे मान्यच केले. पक्षात निष्ठावंत आणि आयाराम असे दोन गट पक्ष विस्तारला तेव्हापासून आहेत. महापालिका निवडणुकीवेळी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घाऊक भरती केली. तीच स्थिती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या वेळीही होती. यामुळे जिल्हा परिषद व महापालिकेची सत्ता भाजपच्या हाती आली. मिळालेली सत्ताही भाजपला टिकवता आली नाही. महापालिकेतील महापौर व उपमहापौर निवडीवेळी भाजपने सत्ता गमावली. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने फारसे लक्ष घातले नाही, म्हणून सत्ता अबाधित राहिली, अन्यथा २७ पैकी १७ सदस्यांनी पदाधिकारी बदलाची मागणी पुढे करीत सवतासुभा मांडलाच होता. जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाच्या मागणीला खुद्द खासदारांचे पाठबळ होते. सरत्या काळातील अध्यक्ष निवासात वॉटर एटीएमच्या निविदेवरून झालेला गोंधळ सर्वश्रुत आहे. अगदी झाडासाठी आणलेल्या कुंडय़ाही मारहाणीसाठी वापरण्यात आल्या. राजकीय ताकदीनेही  मारामारी पोलीस ठाण्यात नोंदण्यापुर्वीच मिटवली गेली. जिल्हा परिषदेचा पहिला अडीच वर्षांचा कारभार वगळता उर्वरित काळात सुंदोपसुंदीच पाहण्यास मिळाली. अध्यक्षपदी महिला आणि कारभार मात्र दिराकडे अशी अवस्था जिल्हा परिषदेच्या कारभाराची झाली होती. महापालिकेतही एकाच प्रस्थापित गटानेच सत्तेचा मलिदा दबावतंत्राचा वापर करीत ताटात वाढून घेतला. ज्यांना पदाचे वचन दिले होते, त्यांना मात्र हुलीवरच ठेवण्यात आले. यातून निर्माण झालेल्या नाराजीतून सात नगरसेवकांनी विरोधी गटाला मदत करीत भाजपच्या सत्तेला सुरूंग लावला. यातून बोध घेत आता महापालिकेच्या स्थायी, समाजकल्याण व महिला-बालकल्याण समिती सभापतीपदे राखण्यात पक्षाला यश आले. हे वास्तव मान्यच करावे लागेल.

Karnataka CM Siddaramaiah calls PM Modi nalayak loksabha election 2024
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींना म्हटले ‘नालायक’; ‘चंबू’वरुन राजकारण का तापलंय?
ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी
nana patole, criticize, bjp, narendra modi government, not win 2024 election, lok sabha 2024, marathi news,
“सत्ताबदल अटळ, नंतर भाजपाची अवस्था काय होणार, हे स्पष्टच” नाना पटोले यांचे विधान; म्हणाले, “अनेक नेते शिफ्टिंगच्या…”

पालिका निवडणुकीत कसोटी

 महापालिका निवडणुकीवेळी पुन्हा उमेदवारी वाटपावेळी पक्षाची कसोटी लागणार आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा आणि सांगली व हातकणंगले हे दोन लोकसभा मतदारसंघ ताकदीने लढवून जिंकण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी असे आवाहन बावनकुळे यांनी या बैठकीत केले. म्हणजे शतप्रतिशत भाजप अशीच भूमिका भाजपची असेल तर मित्रपक्ष असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना यांच्या वाटय़ाला काय, हा प्रश्न उरतोच, खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर हे सत्ता परिवर्तनात महत्त्वाचे हिरो ठरले आहेत. याचा विसर पडला की जाणीवपूर्वक बाबरांना घरी बसविण्याची पक्षाची तयारी सुरू आहे हे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही. याचबरोबर इस्लामपुरातील रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत अद्याप विधान परिषदेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या संघटनेला नव्या राजकीय मांडणीत स्थान असेलच असे नाही हे स्पष्ट आहे. कारण जर आठही आमदार भाजपचे करायचे म्हटले तर भाजपला मित्रपक्षांची गरज नाही असाच अर्थ होतो.

पदे एकाच घरात

पक्षातील काही निष्ठावानांनी पदे वाटपात अन्याय होत असल्याची भावना जाहीरपणे व्यक्त केली आहे. पक्षामध्ये गटबाजीला कोणताही थारा असणार नाही हे प्रत्यक्ष कृतीतून समोर यायला हवे, मात्र तसे होताना दिसत नाही. महापालिका स्थायी सभापतीपद एकाच घरात दोन वेळा देण्यात आले. अन्य कोणी पक्षात या पदासाठी पात्र नव्हते का, हा प्रश्न उपस्थित होतो. बाहेरून आलेल्यांना सन्मान, लाभाची पदे देऊन त्यांना मोठे करण्यातच पक्षाच्या विस्ताराचे खरे गणित दडले आहे. निष्ठावानांनी तीन दशकापुर्वी सतरंज्या उचलल्या, आता बदलत्या काळात खुच्र्या उचलायच्या हीच भाजपची नीती आतापर्यंत दिसून आली आहे. जिल्ह्यात शत प्रतिशत भाजपचे स्वप्न कार्यकर्त्यांना दाखविणे सोपे आहे, मात्र अगदी एकत्रित लढा दिला तर इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनाही पराभूत करता येईल, असा विश्वास या वेळी व्यक्त केला. मात्र सांगलीत भाजपचे कमळ उमलले ते केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे हे मात्र विसरले जाते. इस्लामपूरमध्ये विरोधकांमधील बेकी हेच जयंत पाटील यांच्या यशाचे रहस्य आहे.