सांंगली : रात्री पिकाला पाणी देण्यासाठी गेला असता वीजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या शेतकर्याचे पार्थिव आणण्यासाठी रस्ताच नसल्याने झोळीचा वापर करण्याचा प्रसंग मिरजेजवळ वड्डी या गावी आला. शेतकर्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा अशी मागणी होत असताना अंधार्या रात्री जीव मुठीत धरून शेती करणार्या शेतकर्याच्या मरणयातना मरणानंतरही संपत नाहीत याचीच प्रचिती यामुळे आली.
हेही वाचा – मोदींच्या सभेत घोषणा देणारा तरूण शरद पवारांना भेटला होता! पवारांनी स्पष्ट केली भूमिका
मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी गेल्या निवडणुकीत मागणी मुक्त मतदारसंघ अशी घोषणाही केली होती. मात्र, आजही पाणंद रस्ते, वाडी वस्तीवरील रस्ते विकासापासून बाजूलाच राहिले आहेत. काल वड्डी येथे रात्री पिकाला पाणी देण्यासाठी गेलेले शेतकरी संतोष येसुमाळी यांचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. मृत्यूनंतर पार्थिव शवविच्छेनासाठी नेण्यात येणार होते. या वेळी घटनास्थळी शववाहिका रस्त्याअभावी पोहोचू शकत नव्हती. यामुळे पार्थिव झोळीतून तब्बल दीड किलोमीटर अंतर पार करून आणावे लागले. त्यानंतर मुख्य रस्त्यापर्यंत ट्रॅक्टरमध्ये घालून पार्थिव आणण्यात आले. त्यानंतर शववाहिकेतून रुग्णालयापर्यंतचा पार्थिवाचा प्रवास करावा लागला.