सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे गावात एकाच कुटुंबातील चौघांकडून विष प्राशन करण्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. यातील दोन महिलांचा मृत्यू झाला असून, बाप-लेकाची प्रकृती अत्यवस्थ आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे गावातील एकाच कुटुंबातील चौघांनी पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार विष प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. वडील आणि मुलाला उपचारांसाठी मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे व पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या कुटुंबातील चार सदस्यांनी विष प्राशन केले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. नांगोळे गावातील घरामध्ये शुक्रवारी सकाळच्या सुमारास कुटुंबातील एका वयस्कर महिलेने घरातील चौघेजण निपचिप पडलेले आहेत, हे पाहिल्यानंतर आरडाओरडा करून शेजारी राहणाऱ्या सर्वांना बोलावले.
घटनास्थळी पोलिसांना चार ग्लास सापडले. त्या ठिकाणी कापून ठेवलेले लिंबू आणि सुरीदेखील सापडली. त्या ठिकाणापासून बाजूलाच जनावरांसाठी वापरले जाणारे विषारी औषधदेखील सापडले. यामुळे या चार जणांनी विषारी औषध प्राशन केले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.