सांगली : महाविकास आघाडीतील काँग्रेस नेत्यांचा दबाव झुगारत विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचा आपला निर्णय सोमवारी कायम ठेवला. यामुळे सांगलीत आता बहुरंगी लढत होत असली तरी खरी लढत महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष अशी तिरंगी होत आहे.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा उबाठा शिवसेनेला गेली. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी दाखल केली. दरम्यान जागा वाटपाचा फेरविचार होऊन सांगलीत पुन्हा काँग्रेसला संधी मिळेल या आशेवर पाटील होते. मात्र शिवसेनेने फेरविचार टाळून आपली उमेदवारी कायम ठेवली. दरम्यान, विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारीही दाखल केली होती.

हेही वाचा : भाजपा अन् काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जुंपली; पटोले म्हणाले, “नाचता येईना अंगण वाकडं” तर चव्हाण म्हणतात, “नानांनी भरपूर…”

गेले दोन दिवस पाटील यांनी अपक्ष उमेदवारी मागे घेऊन मविआचे पैलवान पाटील यांना पाठिंबा द्यावा यासाठी राजकीय दबाव टाकण्याचे प्रयत्नही झाले. मात्र, अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पाटील यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी दाखल करत असताना मागणी केलेली तीनही चिन्हे वगळून लिफाफा हे चिन्ह त्यांना निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिले आहे. त्यांनी शिट्टी, टेबल आणि गॅस सिलेंडर या तीन चिन्हांची मागणी केली होती. मात्र, त्यांनी प्रथम प्राधान्य दिेलेले शिट्टी हे चिन्ह स्वाभिमानी पक्षाचे महेश खराडे यांना प्रदान करण्यात आले.

हेही वाचा : सोलापुरात ‘वंचित’ची उमेदवारी मागे; भाजपविरोधी मतविभागणी टळणार ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशाल पाटील यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी काँग्रेसने अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. त्यांच्या उमेदवारीचा काँग्रेस श्रेष्ठीकडे आग्रह धरणारे माजी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनीही पुढील राजकीय भवितव्य लक्षात घेउन उमेदवारी मागे घेण्याचे केलेले आवाहन डावलून त्यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.