सांगली : महापालिका क्षेत्रात मोकाट फिरणार्या पशूंना पकडण्याची मोहीम हाती घेतली असून, १४ घोड्यांना पकडून कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहे. पशूपालकांनी मोकाट पशू रस्त्यावर सोडू नयेत, अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त सत्यम गांधी यांनी दिला आहे.
शहरात मुख्य रस्त्यांवर मोकाट प्राणी फिरत आहेत. त्या प्राण्यांचे मालक असूनही त्यांना मोकाट सोडण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे वारंवार अपघात घडत असल्याने मोकाट पशू पकडण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. या मोहिमेत १४ घोडे पकडण्यात आले असून, त्यांना कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहे. या पशूपालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच या पकडलेल्या घोड्यांवर होणारा दैनंदिन खर्चही वसूल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. पाळीव प्राण्यांची योग्य ती जबाबदारी घेणार नसतील तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्वच्छता अधिकारी सचिन सांगावकर यांनी सांगितले.
गाय, कुत्रे, घोडे, अन्य जनावरे मोकळे सोडून नागरिकांना धोकादायक ठरणारे कृत्य केल्यास गुन्हे दाखल करण्याच्या सूचना आयुक्त गांधी यांनी दिल्या आहेत. सांगली, मिरज व कुपवाड या तीनही शहरांतील भटक्या जनावरांवर कारवाई करण्यात येणार आहे, त्याचबरोबर मालकांचा शोध घेण्यात येणार असून, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगावकर यांनी सांगितले.
तिन्ही शहरातील नागरिकांनी बेकायदेशीर गोटा, मोकाट जनावरांच्या मालकांच्या पत्ता ,माहिती देऊन सहकार्य करावे, यामुळे कारवाईस सुलभता होईल असे आवाहन आयुक्त सत्यम गांधी यांनी केले आहे. प्रभाग समिती निहाय पथकाव्दारे सतत कारवाई करण्यात येत असून मुख्य स्वच्छता अधिकारी सांगावकर यांनी मनपा क्षेत्रातील सर्व वार्ड निहाय भागात भटकी जनावरे पकडण्यासाठी नियोजन मा उप आयुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली केले आहे, पुन पुन्हा नियम मोडणार्या मालकांविरोधात अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही देखील करण्यात येत आहे. सन २०२१ पासून साधारणपणे ५००० वर भटक्या कुत्र्यावर नसंबंधी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे अशी माहिती डॉ गोस्वामी यांनी दिली आहे. मोकाट जनावरांचा त्रास आढळल्यास नागरिकांनी त्वरित मनपाच्या नियंत्रण कक्षास कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.