सांगली : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे २४ तास उरले असताना रविवारी अनेक उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत रविवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी दाखल करण्याची मुदत सोमवारी दुपारी समाप्त होणार असतानाही महायुती व महाविकास आघाडीच्या अंतिम उमेदवार अनिश्चित असल्याने अखेरच्या दिवशी उमेदवारी दाखल करण्यासाठी झुंबड उडणार आहे.
जिल्ह्यात आष्टा, ईश्वरपूर, विटा, जत, पलूस आणि तासगाव या सहा नगरपालिका व शिराळा, आटपाडी या नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. दि. १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षामध्ये जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे.
ईश्वरपूर, आष्टा, तासगाव या ठिकाणी महायुती एकसंघपणे निवडणूक मैदानात उतरली असली तरी विटा व जत नगरपालिका, आटपाडी, शिराळा नगरपंचायतीच्या निवडणुकीत आघाडी व युतीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र आहे. विटा व आटपाडी येथे भाजप व शिवसेना शिंदे गट परस्परविरोधात मैदानात उतरले आहेत, तर जत व शिराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे. या पार्श्वभूमीवर आज मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणूक आयोगानेही शनिवारी व रविवारी सार्वत्रिक सुट्टी असतानाही उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुभा दिली होती.
वाद्यांचा गजर करत आतषबाजीसह जोरदार घोषणाबाजी करत अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले. गेल्या आठ दिवसांपासून विविध प्रभागांतून उमेदवारीसाठी इच्छुकांची अंतिम यादी तयार करण्यात नेते मंडळींच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी उमेदवारी मागे घेईपर्यंत अटीतटीच्या लढती अनिश्चितच राहणार असल्याचे संकेत मिळाले.
