सांगली : राज्यातील शाळांची पहिली घंटा १६ जून रोजी वाजणार असतानाच एक आठवडा अगोदर सांगली शिक्षण संस्थांच्या शाळा आजपासून सुरू झाल्या. पाचवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचे शाळेतील शिक्षिकांनी फुलपाकळ्यांची उधळण करत औक्षण करून स्वागत केले. जिल्ह्यातील शाळांचे पहिले सत्र दि. १६ जूनपासून सुरू होत आहे. मात्र, सांगली शिक्षण संस्थेने एक आठवडा अगोदरच यंदाच्या शैक्षणिक सत्राचा प्रारंभ केला.
आज शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे स्वागत ढोलताशांच्या गजरात करण्यात आले. शाळेच्या प्रवेशदारावर रांगोळी काढून फुलांचा सडा टाकण्यात आला होता. तसेच पाचवीच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षणही करण्यात येत होते. यानंतर नित्याप्रमाणे सामूहिक प्रार्थना झाल्यानंतर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटपही करण्यात आले.
दरम्यान, नवीन वर्षातील शैक्षणिक सत्र १६ जूनपासून सुरू होत असून, दि. १६ ते ३० जून या कालावधीत प्रवेशोत्सव कार्यक्रम शिक्षण विभागाच्यावतीने राबविण्यात येणार आहे. या कालावधीत दाखलपात्र मुलांची यादी तयार करून ती चौकात प्रदर्शित करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या असल्याचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले. शाळा सुरू होण्यापूर्वी तीन दिवस अगोदर गावात दवंडी देण्यात येणार आहे. एक दिवस अगोदर शिक्षकामार्फत गृहभेटी निश्चित करण्यात आल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे स्वागत स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांकडून पुष्प देऊन करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. शाळेचा पहिला दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येत असून, याच दिवशी मुलांना पुस्तके वितरीत केली जाणार आहेत.