सांगली : तब्बल २३ वर्षांच्या खंडानंतर नागपंचमीवेळी शिराळ्यात जिवंत नागाचे दर्शन हजारो भाविकांना मंगळवारी झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत प्रतीकात्मक नागपूजाही करण्यात आली. अंबाबाईच्या नावानं चांगभलंच्या गजरात प्रतीकात्मक नागाच्या ढोल, ताशांसह सवाद्य मिरवणुकाही रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या.
जिवंत नागांची पूजा अथवा प्रदर्शन, खेळ करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली असून केंद्रीय वन मंत्रालयाने २१ अर्जदारांना नाग हाताळण्यास अटी, शर्तीवर परवानगी दिली आहे. शैक्षणिक उद्देशासाठी व स्थानिक लोकांमध्ये व समाजामध्ये सर्प संवर्धनाचे पारंपरिक ज्ञान प्रसारासाठी नाग पकडण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिल्यामुळे सर्वत्र समाधानाचे वातावरण होते. मंगळवारी परवानगी मिळालेल्या अर्जदारांनी वन विभागाच्या देखरेखीखाली नाग पकडून त्याबाबत माहिती दिली.
जिवंत नागांची पूजा करणारे बत्तीस शिराळा जगप्रसिध्द असून २००२ पासून सर्वोच्च न्यायालयाने सर्पाची हाताळणी, प्रदर्शन, मिरवणूक व खेळ करण्यास बंदी घातल्यानंतर शहरात प्रतीकात्मक नागपूजा करण्यात येत आहे.
आज सकाळी पांडुरंग उर्फ प्रमोद महाजन यांच्या घरात मानाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. तर रामचंद्र महाजन यांच्याही घरी पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी पालखीचे मानकरी, कोतवाल, डवरी, भोई उपस्थित होते. यावेळी मानाच्या नाग प्रतिमेचे पूजन विनोद जोशी, संतोष जोशी, सुयोग जोशी यांच्या पौरोहित्याखाली करण्यात आले. यानंतर नायकूडपुरा येथून गुरुवार पेठ, कुरणे गल्ली, सोमवार पेठेतून अंबामाता मंदिरापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत नाग मंडळाचे कार्यकर्ते, तरूण सहभागी झाले होते. यावेळी अंबाबाईच्या नावाने चांगभलंचा गजर केला जात होता.
यानंतर विविध नाग मंडळाच्या मिरवणुकांना प्रारंभ झाला. ढोल, ताशांच्या गजरात या मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी ध्वनिवर्धकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. मिरवणूक शांततेत पार पडावी, न्यायालयीन आदेशाचा भंग केला जाऊ नये यासाठी वन विभागाचे कर्मचारी प्रत्येक मंडळाच्या मिरवणुकीत लक्ष ठेवून होते. तसेच मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख करण्यात येत होती.
उपवनसंरक्षक सागर गवते, विभागीय वन अधिकारी दक्षता पथक संजय वाघमोडे, सहायक वनसंरक्षक विलास काळे, जयश्री जगताप, वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे १३५ अधिकाऱ्यांसह कर्मचारी नियुक्त केले होते. तसेच ७ तपासणी नाके, १० गस्ती पथके, ४ सर्प मित्र, ५४ वनमजूर यांची नियुक्ती केली होती. मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ५०० पोलिसांचा ताफा तैनात होता. आरोग्य विभागाने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील व डॉ. एन. बी. कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली ७ वैद्यकीय पथके व ३२ फिरती वैद्यकीय पथके ठेवण्यात आली होती.
खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजित देशमुख, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आदी मिरवणुकीत सहभागी झाले होते.