सांगली : भूतबाधा झाली असेल, तर उफराट्या पंखांचा कोंबडा, अंडी असा उतारा गाववेशीबाहेर देण्याची अंधश्रद्धा रूढ असली, तरी यंदाच्या श्रावणात भूत मांसाहारी न राहता चक्क शाकाहारी बनल्याची घटना कृष्णाकाठी आमणापूर परिसरात दिसून आली. व्रतवैकल्य पाळण्याचा वसा केवळ श्रद्धाळूंनीच घेतला आहे असे नव्हे, तर भूताखेतांनीही आपल्या आहारात बदल केल्याचे टाकण्यात आलेल्या उताऱ्यावरून दिसून आले.
कोणाचे अंग तापाने फणफणले, कोणी असंबद्ध बडबडू लागला, तर गावाबाहेरच्या स्मशानभूमी रस्त्यावरील वडाच्या, पिंपळाच्या झाडाखाली, तर कधी तिकटण्याला उतारा देण्याची अंधश्रद्धा असते. मात्र, हा उतारा उफराट्या पंखाचे कोंबडे, कोंबडीचे अंडे, भाकरीचा दामटा, तेलचटणी आणि तव्याचे काळे लावण्याचा असतो. उतारा म्हणून शक्यतो मांसाहारी पदार्थांचा भरणा अधिक असतो. श्रावणात बहुसंख्य लोक मांसाहार वर्ज्य करतात. उपवास आणि सण अधिक असल्याने बहुतेक कुटुंबांत या महिन्यात मांसाहाराला बंदी असते.
याच स्थितीत भूतांना उतारा म्हणून फलाहार देण्याचा प्रकार आमणापूर (ता. पलूस) येथील काळा ओढा येथे असलेल्या पुलावर आढळून आला. आतापर्यंत ‘मांसाहारी’ म्हणून ओळखले जाणारे ही ‘प्रेतात्मे’ आधुनिक झाले की काय, असा प्रश्न या निमित्ताने अनेकांना पडला आहे.
नेहमीप्रमाणे आमणापूर-येळावी रस्त्यावरच्या काळा ओढ्याच्या पुलावर पुन्हा एकदा उतारा टाकलेला होता. आजपर्यंत या उताऱ्यामध्ये उलट्या पंखांचे जिवंत कोंबडे, भाकरी-भात, अंडी, चिकन, मटण अशा पदार्थांचाच समावेश असायचा. या निर्जन रस्त्यावरून जाताना हे दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. पण उतारा म्हणून टाकण्यात आलेले पदार्थ पाहून काळजाला धडकी भरण्याऐवजी अनेकांना हसू आले. कारण उताऱ्यात एकही मांसाहारी पदार्थ नव्हता! या उताऱ्यात लिंबू, कोंबडीचे पंख, सीताफळ, डाळिंब आणि केळी यांसारखी फळे होती. हे बघून अंधश्रद्धाळूंनी आता भुतांनाही श्रावण पाळायला लावला की काय, असा प्रश्न लोक विचारत आहेत.
हे सर्व जरी गमतीने आणि विनोदाने सांगितले असले, तरी या घटना गंभीर आहेत. अशा प्रकारचे उतारा, जादूटोणा किंवा कर्मकांडे ही केवळ अंधश्रद्धेचा भाग आहेत. यामुळे कोणत्याही समस्येवर तोडगा निघत नाही, उलट समाजात गैरसमज पसरतात. आपल्या समाजात प्रगती होत असताना, अशा विचारांना थारा देणे योग्य नाही. म्हणूनच, अशा कृत्यांपासून दूर राहण्याचे, तसेच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी केले आहे.