सांगली : आटपाडी बस स्थानकाजवळ दुचाकीला ठोकर मारून पलायनाच्या प्रयत्नात असलेल्या मारूती ओमनी मोटार ट्रॅक्टर ट्रॉलीखाली गेल्याने झालेल्या अपघातात दोघे जण ठार झाल्याची घटना आटपाडी तालुययात घडली. अपघातग्रस्त कराड तालुक्यातील आहेत. अपघातात वसंत उत्तम यादव (वय ४३) व आर्यन मोहिते (वय १८ रा. कालेटेक ता. कराड, जिल्हा सातारा) या दोघांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात ओमणी गाडीचा चक्काचूर झाला. तर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक निखळले.

मारूती ओमनी मोटार आटपाडीतून भरधाव वेगाने भिवघाटकडे निघाली होती. यावेळी बसस्थानक परिसरात या मोटारीने एका दुचाकीस्वाराला ठोकरले. आटपाडी शहरातील आटपाडी- भिवाघाट रस्त्यावरील सिद्धनाथ मंदिराच्या जवळ सायंकाळी फिरोज लतीफ सय्यद हे दुचाकीवर थांबले होते. यावेळी दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. दुचाकीला ठोकरल्याने नागरिक जमा होतील, ठोकरल्याचा जाब विचारतील, कदाचित मारहाणही होईल या भीतीने ओमनी चालकांने मोटार तशीच पुढे दामटली.

भिवघाटाच्या दिशेने मोटार जात असताना पाठीमागून होत असलेला पाठलाग लक्षात आल्यानंतर ओमनी अधिक वेगाने पुढे नेण्याचा चालकाचा प्रयत्न होता. या दरम्यान, भिंगेवाडी येथे आटपाडीच्या दिशेने वीट वाहतूक करणारा टॅ्क्टर येत होता. सायंकाळची वेळ असल्याने थोडा अंधारही पडला होता. पाठलाग चुकविण्याच्या प्रयत्नात ओमनी चालकाला समोरून येणार्‍या ट्रॅयटरचा अंदाज आला नाही. वेगात असलेली मोटार ट्रॅयटरच्या दोन्ही ट्रॉलीमध्ये जाउन अडकली. यात गेल्याने ओमणी गाडीचा (एम.एच.११ ए के ८७४५) चक्काचूर झाला होता.

अपघातात चालक वसंत यादव यांचे शरीर छिन्नविछिन्न झाले होते. ओमणी कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आला. तर तरूणही गंभीर जखमी झाला होता.मदत पोहचेपर्यंत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच आटपाडी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत ओमनी मोटारीतील मृतदेह बाहेर काढले. याची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रात्री उशिरा शवविच्छेदनानंतर पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.