सांगली : कधी बाजारात, कधी बसमध्ये तर कधी अगदी राहत्या घरात चोरी होते. चोरी होण्यात वेगळेपण काहीच नाही. मात्र, सांगलीत चक्क गाढवांची चोरी झाली. तेही एखाद्या नव्हे तर चक्क २३ गाढवांची चोरी झाली आणि याबद्दल गाढवांच्या मालकांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केल्यानंतर गाढव चोरीप्रकरणी अज्ञाताविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला.
सांगलीतील अरविंद माने यांच्या मालकीची ही गाढवे आहेत. या गाढवांचा वापर प्रामुख्याने वीटभट्टी, बांधकाम साहित्याची ने-आण करण्यासाठी आणि शेतीच्या कामात माती, मुरूम वाहतुकीसाठी केला जातो. या गाढवांना सकाळी काही वेळ काम दिले जाते. यानंतर त्यांना मोकाट सोडले जाते. यामुळे दिवसभर रस्त्यावर, रस्त्याकडेला मोकाट हिंडणारी गाढवे पाहण्यास मिळतात.
२२ जुलै रोजी रात्री दहा वाजता शिवाजी मंडई येथे असलेली गाढवे २३ जुलै रोजी गायब झाल्याचे दिसून आले. शोधाशोध करूनही गाढवे मिळत नाहीत हे पाहून माने यांनी या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात २३ गाढवांची अज्ञाताने चोरी केली असल्याची तक्रार दाखल केली आहे. या गाढवांचे मूल्य प्रत्येकी १५ हजार रुपयांप्रमाणे ३ लाख ४५ हजार रुपये होत असून या प्रकरणी अज्ञात गाढव चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.