आणखी एक ५० वाघिणींची रेल्वेगाडी येणार

लातूरसाठी दोन दिवसातून ७५ लाख लिटर पाणी देण्याची तयारी सध्या मिरज रेल्वे स्थानकावर सुरू असून यासाठी आणखी एक ५० वाघिणींची गाडी औरंगाबादहून मिरजेत येणार आहे. सध्या लातूरसाठी रोज ५० वाघिणीतून २५ लाख लिटर पाणी पाठविण्यात येत आहे. आतापर्यंत साडेपाच कोटी लिटर पाणी लातूरला पोहोच करण्यात आले आहे.

लातूरसाठी मिरजेतून पुरविण्यात येणारे रोजचे २५ लाख लिटर पाणी पुरेसे ठरत नाही. याला पर्याय म्हणून परतूर स्थानकावरून रेल्वेने पाणी देण्याची योजना पडताळून पाहण्यात येत होती. मात्र ही योजना प्रत्यक्ष कृतीत आणणे आणि वेळेत पाणी पोहोच करणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर मिरजेतूनच पाणी पुरवठा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या मिरजेतून लातूरसाठी पाणी पाठविण्यासाठी ५० वाघिणीच्या दोन गाडय़ा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आणखी एक गाडी उपलब्ध करून देण्यात आली, तर दोन दिवसातून तीन खेपांनी ७५ लाख लिटर पाणी लातूरला देता येऊ शकते, या निर्णयाप्रत प्रशासन आले आहे. यासाठी लागणारी आणखी एक ५० वाघिणीची रेल्वे गाडी औरंगाबादहून मिरजेकडे पाठविण्यात येणार आहे.

याबाबत या संकल्पनेचे प्रवर्तक मकरंद देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मिरजेहून लातूरला दर दोन दिवसात तीन गाडय़ा पाठविण्याचे नियोजन प्रशासन सध्या करीत असून त्यासाठी लागणारी यंत्रणा सक्षम आहे. मात्र याबाबत अधिकृत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तशा तोंडी सूचना मिळाल्या आहेत. कदाचित उद्यापर्यंत तिसरी गाडी मिरज स्थानकावर येऊ शकेल.