बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाने उमेदवार जाहीर करण्यापूर्वीच आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे शिंदे गटात फूट पडली की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. तसेच कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, हा संभ्रम आता दूर झाला आहे. याबाबत स्वत: आमदार संजय गायकवाड यांनी खुलासा केला असून उमेदवारी अर्ज का भरला याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा – अमरावतीत बच्चू कडूंचा ‘प्रहार’; नवनीत राणांविरोधात ठाकरे गटाच्या नेत्याला दिली उमेदवारी

आज ( शुक्रवार, २९ मार्च) बुलढाणा येथे महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर आमदार गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याबाबत स्पष्टीकरण दिलं. मी उमेदवारी अर्ज भरण्यामागे एक विशिष्ट कारण होतं. ही माझी योजना होती. ती योजना यशस्वी झाली आहे, अशी प्रतिक्रया आमदार संजय गायकवाड यांनी दिली. तसेच खासदार प्रतापराव जाधव यांना निवडून आणण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी बोलताना संजय गायकवाड म्हणाले, आज महायुतीची सभा पार पडली आहे. ही सभा मी पाच दिवसांपूर्वीच आयोजित केल्याचे भाषणात सांगितले. राहिला प्रश्न माझ्या उमेदवारी अर्ज भरण्याचा तर, मी जो उमेदवारी अर्ज भरला होता, ती माझी योजना होती. माझी निवडणूक लढण्याची कोणतीही इच्छा नव्हती. मी पक्षाकडे कोणाताही अर्ज केला नव्हता. पण मला जे साध्य करायचं होतं, ते मी साध्य केलं आहे.

हेही वाचा – भाजपच्या ‘लेटरहेड’वर मुख्यमंत्र्याचे आदेश, उच्च न्यायालय म्हणाले, बेकायदेशीर……

दरम्यान, बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी सायंकाळी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून आठ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.