Maharashtra Political Crisis, Chhatrapati Shivaji Maharaj’s Ganimi Kava : मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटातील नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधानं करण्याचा तडाखा लावला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी अलीकडेच शिवाजी महाराज हे जुने आदर्श होते, असं म्हटलं. यावरून महाराष्ट्रातील राजकारण बरंच तापलं होतं. हे प्रकरण ताजं असताना भाजपा नेते आणि महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेशी केली.

लोढा यांच्या विधानावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राच्या पर्यटन मंत्र्यांला तरी किमान शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत असणं आवश्यक आहे. त्यांनी बेइमान व्यक्तीची तुलना शिवाजी महाराजांशी केली, अशी टीका राऊतांनी केली.

हेही वाचा- “एकनाथ शिंदेंना कुणी बंदी ठेवलं होतं?” अजित पवारांचा मंगलप्रभात लोढांना थेट सवाल!

राऊतांच्या या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र, यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची तुलना शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याशी केली. यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- “घोडचुकीनंतर एखादा निर्लज्जच…” राज्यपाल कोश्यारींच्या विधानावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले की, “महाराष्ट्राच्या इतिहासाची जाणीव असली पाहिजे, यात काहीही दुमत नाही. पण एकनाथ शिंदे हे बेइमान व्यक्ती नाहीत. शिवाजी महाराजांनीदेखील वेळप्रसंगी ‘गनिमी कावा’ केला होता. तोच गनिमी कावा एकनाथ शिंदे यांनीदेखील वापरला आहे. याआधी ज्या नेत्यांनी शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधानं केली आहेत, त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिली आहे. त्यामुळे ही लोकं पुन्हा असं काही बोलतील, असं वाटत नाही” असंही गायकवाड म्हणाले. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.