scorecardresearch

“घोडचुकीनंतर एखादा निर्लज्जच…” राज्यपाल कोश्यारींच्या विधानावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया

“हा काय मूर्खपणा आहे?” म्हणत खासदार उदयनराजे यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.

“घोडचुकीनंतर एखादा निर्लज्जच…” राज्यपाल कोश्यारींच्या विधानावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
फोटो/ लोकसत्ता ग्राफिक्स टीम

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यांच्या विधानानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनी भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. पण त्यांना अद्याप राज्यपाल पदावरून हटवलं नाही.

या घटनाक्रमानंतर शिवाजी महाराजांचे वंशज आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. एवढ्या मोठ्या घोडचुकीनंतर एखादा निर्लज्ज व्यक्तीच राज्यपाल पदावर राहू शकतो, अशी टीका उदयनराजे यांनी केली. ते सातारा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा- एकनाथ शिंदेंच्या बंडाची आग्र्यातून शिवरायांच्या सुटकेशी तुलना करणाऱ्या लोढांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

राज्यपाल कोश्यारींना पदावरून हटवण्याबाबत विचारलं असता उदयनराजे म्हणाले, “त्यांनी एवढी मोठी घोडचूक केली आहे. तरीही एखादा निर्लज्जच त्या पदावर राहू शकतो. मुळात त्यांनी असं विधानच कसं केलं? हेच मला कळत नाही. त्यांचं वय पाहता त्यांना वृद्धाश्रमात पाठवायला हवं. पण त्यांना वृद्धाश्रमात घेतील की नाही? याबाबत शंका आहे. कारण ते तिथेही काहीतरी वाद-विवाद निर्माण करतील. त्यामुळे त्यांची तेथूनही हकालपट्टी होईल.”

हेही वाचा- एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंत्री लोढांना अजित पवारांनी खडसावलं; म्हणाले, “वाचळविरांना आवरा हे…”

“वृद्धाश्रमाव्यतिरिक्त आता फक्त एकच ठिकाण उरतं, जिथे त्यांना पाठवता येऊ शकतं, ते म्हणजे वेड्यांचं रुग्णालय. कारण वेड्यांना तिथेच ठेवलं जातं. त्यांच्या विधानावरून त्यांना वेडेच म्हणावं लागेल. ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ या म्हणीप्रमाणे ते कुठेही काहीही बोलतात. त्यांना नेमकी मस्ती कशी आली? आणि त्यांच्या असं बोलण्याचं नेमकं कारण काय? हेच मला कळत नाही. याआधीही त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत बोलले होते, हा काय मूर्खपणा सुरू आहे. त्यांना या सगळ्या गोष्टींचं काय देणं-घेणं असतं, त्यांची लायकी आहे का?” अशा शब्दांत उदयनराजेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 19:51 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या