राज्यात भाजपा-शिंदे गटाचं सरकार असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षदेखील सत्तेत सहभागी झाला आहे. महायुतीत पक्षांची संख्या आता वाढली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात शिंदे गटाला कमी मंत्रीपदं मिळाली आहे. तसेच, आगामी काळात जागावाटपाच्या वेळी महायुतीतल्या पक्षांमध्ये संघर्ष होऊ शकतो, असं बोललं जात आहे. यावर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी भाष्य केलं आहे. संजय गायकवाड म्हणाले, सरकारमध्ये एक नवा पक्ष आल्याने सत्तेचं विभाजन झालं आहे. काही खाती त्यांना (अजित पवार गट) मिळाली आहेत. ही वस्तूस्थिती असून आम्हाला ती मान्य आहे.

विधीमंडळाबाहेर आमदार संजय गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी गायकवाड यांना प्रश्न विचारण्यात आला की, महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच्या प्रवेशाने शिंदे गटाची गोची झाल्याचं बोललं जात आहे. कारण, जागावाटपात शिंदे गटासमोर वेगवेगळी आव्हानं असणार आहेत. यावर काय सांगाल. या प्रश्नावर उत्तर देताना आमदार संजय गायकवाड म्हणाले, विधानसभेच्या जागावाटपाला अजून एक ते सव्वा वर्ष बाकी आहे. या गोष्टीला खूप वेळ आहे.

आमदार संजय गायकवाड म्हणाले, राज्यात ज्या-ज्या मतदारसंघात शिवसेना एक नंबरला किंवा दोन नंबरवर आहे तिथे शिवसेना लढणारच आहे. तसेच आगामी निवडणुकीत आम्ही १०० प्लसचं (विधानसभेच्या १०० हून अधिक जागांचं) टार्गेट घेऊन जाणार आहोत. शेवटी तिन्ही पक्ष मिळून एकमेकांच्या सल्ल्याने समाधानकारक पद्धतीने जागांचं वाटप करू. सर्वाचं समाधान होईल आणि येत्या काळात तिन्ही पक्षांचं सरकार येईल.

हे ही वाचा >> शरद पवारांना पाठिंबा देणारे आमदार विधानसभेच्या अधिवेशनाला गैरहजर, कारण देत म्हणाले…

जागावाटपाच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिंदे गटात याआधी तणाव निर्माण झाला होता. दोन महिन्यांपूर्वी (तेव्हा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हता) भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा प्रवक्त्यांना आवाहन केलं होतं की, आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २४० जागा लढवण्याचा भाजपाचा विचार आहे त्यामुळे तयारीला लागा. तेव्हा शिंदे गट आक्रमक झाला होता. तेव्हा आमदार संजय गायकवाड म्हणाले होते की, “शिवसेना म्हणून आम्ही कमीत कमी १३० ते १४० जागा लढवणार आहोत. आमच्यापेक्षा तो पक्ष (भाजपा) मोठा असल्याने निश्चितपणे भाजपा जास्त जागा लढेल. पण आम्ही शिवसेना म्हणून १२५ पेक्षा कमी जागा लढणार नाही.