कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व काँग्रेसचे सहयोगी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र संजय मंडलिक यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर त्यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, शिवसेनेकडून लोकसभेसाठी इच्छुक असलेले जिल्हाप्रमुख विजय देवणे उपस्थित होते. देवणे यांनी लोकसभेसाठी जो उमेदवार देतील त्याचा प्रचार करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. यामुळे मंडलिक हे धनुष्यबाण चिन्हाचे उमेदवार असणार हे निश्चित झाले आहे.
गेल्या निवडणुकीत शरद पवार यांच्याशी काडीमोड घेत सदाशिवराव मंडलिक यांनी अपक्ष म्हणून िरगणात उतरत राष्ट्रवादीचे उमेदवार युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव करत खासदारकी मिळवली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व पत्करले. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्यांनी काँग्रेस झेंडय़ाखाली लढवत जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता मिळवत पुत्र संजय मंडलिक यांना अध्यक्षपदी बसवले.
लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडाल्यावर सदाशिवराव मंडलिक यांच्यासह काँग्रेसने कोल्हापूरची जागा आपल्याकडे मागितली. त्यासाठी मंडलिक पिता-पुत्रांनी दिल्लीत हायकमांडकडे साकडे घालण्यासाठी तळ ठोकला. परंतु त्यात त्यांना यश आले नाही आणि ही जागा राष्ट्रवादीच्याच वाटय़ाला गेली. त्यानंतरही मंडलिकांनी प्रयत्न सुरू ठेवले आणि सरतेशेवटी खासदार राजू शेट्टींच्या हातात हात घालून महायुतीत सामील होऊन राष्ट्रवादीला विरोध करण्याच्या हालचाली सुरू केल्या. आज याअंतर्गतच संजय मंडलिक यांनी शिवसेनेत प्रवेश करत पुढचे पाऊल टाकले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay mandlik in shivsena
First published on: 02-03-2014 at 02:25 IST