जळगावातील पाचोऱ्यात आज ठाकरे गटाची सभा होणार आहे. मात्र, या सभेपूर्वी खासदार संजय राऊत यांनी जळगावचे पालकमंत्री तथा शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच गुलाबराव पाटील यांनी करोना काळात ४०० कोटी रुपायांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांनी केला. जळगावमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल”, अजित पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

जळगावमध्ये गुलाबो गॅंग आहे. ज्यांनी ५० कोटी रुपये घेऊन शिवसेना सोडली. हे लोक शिवसेनेच्या मेहेरबानीने निवडून आले आणि मग विकले गेले. ते आज आम्हाला धमक्या देत आहेत. पण जळगाव ही सुवर्ण नगरी आहे. येथील काही दगड सोनं म्हणून आमच्याकडे होते, पण ते दगडच निघाले, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

हेही वाचा – पुण्यात नवले पुलाजवळ ट्रक आणि ट्रॅव्हलस बसचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, तर २२ जण जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुलाबराव पाटलांवर केले भ्रष्टाचाराचे आरोप

पुढे बोलताना त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोपही केले. माझ्याकडे गुलाबराव पाटलांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत. करोना काळात पालकमंत्री आणि जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चढ्या भावात वस्तूंची खरेदी केली होती. यामध्ये ऑक्सिजन व्हेंटीलेटर्सचाही समावेश होता. त्यावेळी दोन लाखांचं व्हेंटीलेटर १५ लाखांना खरेदी केले गेले. महत्त्वाचे म्हणजे या भ्रष्टाचारावर त्याच गॅंगचे सदस्य चिमनराव पाटील यांनीही प्रश्न उपस्थित केले होते. हा घोटाळा साधारण ४०० कोटी रुपयांचा आहे. मात्र, हे प्रकरण दाबलं जात आहे, असे ते म्हणाले.