Sanjay Raut Meet Sharad Pawar : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी आज खासदार शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. नरकातील स्वर्ग या त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे औपारिक निमंत्रण देण्याकरता ही भेट घेण्यात आली होती. यासंदर्भातील माहिती शरद पवारांनी समाज माध्यमांवरून दिली आहे.

संजय राऊतांनी भेट दिल्यानंतर शरद पवारांनी त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शरद पवार म्हणाले, “राज्यसभेचे खासदार तसेच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीच्या वेळी त्यांनी आपल्या लेखणीतून साकारलेल्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे औपचारिक निमंत्रण दिले. या भेटीदरम्यान रोहन तावरे यांनी लिहिलेल्या वन्यजीवनावर आधारित पुस्तकावर सविस्तर चर्चा झाली. त्याचप्रमाणे, राज्य व देशातील विविध मुद्द्यांवरही विचारमंथन झाले. भेटीनंतर मी त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.”

पुस्तक प्रकाशन कधी आहे?

दरम्यान, संजय राऊत लिखित नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे प्रकाशन १७ मे रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे होणार आहे. या कार्यकर्माला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यसभेचे खासदार शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कवी, गीतकार, पटकथा लेखक जावेद अख्तर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

नरकातील स्वर्ग पुस्तकात काय?

दोन वर्षांपूर्वी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. यावेळी ते जवळपास शंभर दिवस तुरुंगात होते. तुरुंगातील या अनुभवावर हे पुस्तक आधारित आहे. या पुस्तकातून सरकार, ईडी, तपास यंत्रणा साऱ्यांचीच पोलखोल केली असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये हे पुस्तक असणार असून हिंदी आणि इंग्रजी भाषेतील अनुवादित पुस्तक दिल्लीत प्रकाशित होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी दिली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“गौप्यस्फोट करणं हा या पुस्तकाचा हेतू नाही. जीवनातील अनुभव कथन करणं, त्याला गौप्यस्फोट म्हणता येणार नाही. जे पाहिलं, अनुभवलं ते सत्य कथन असतं, त्याला सत्यकथन म्हणा”, असंही संजय राऊत म्हणाले होते.