Sanjay Raut on Chhagan Bhujbal & Maratha Reservation GR : मराठा आंदोलकांच्या मागणीनंतर राज्य सरकारने शासन निर्णय जाहीर केला आहे. मात्र, याबाबत मंत्रिमंडळ पातळीवर झालेल्या बैठकांमध्ये राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ उनुपस्थित होते. तसेच त्यांनी या शासन निर्णयाविरोधात न्यायालयाचं दार ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून भुजबळ सरकारवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. याबाबत शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी टिप्पणी केली आहे. ते म्हणाले, “सरकारमध्ये सारं काही आलबेल असल्याचं चित्र दिसत नाही.”
संजय राऊत म्हणाले, “मुळात छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार) मंत्रिमंडळात जागा दिली नव्हती. ओबीसी नेते म्हणून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष घालून मंत्रिमंडळात घ्यायला लावलं. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आदेश दिले होते. भुजबळ आज मंत्री आहेत ही काही अजित पवारांची कृपा नाही, ती पंतप्रधान मोदी यांची कृपा आहे. कारण मोदी हे स्वतःला ओबीसी नेते म्हणवतात. मी ओबीसी आहे, मी ओबीसींचा सर्वात मोठा नेता आहे असं ते म्हणवून घेतात. मुळात कुठल्याही पंतप्रधानाच्या तोंडी अशी जातीची भाषा शोभत नाही. परंतु, मोदी ती जातीची भाषा बोलतात.”
मोदींनीच भुजबळांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घ्यायला लावलं : संजय राऊत
शिवसेनेचे (उबाठा) खासदार म्हणाले, “छगन भुजबळ हे ओबीसी असल्याने पंतप्रधान मोदी यांनी त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री केलं. त्यांनी सर्वांचा विरोध डावलून छगन भुजबळांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घ्यायला लावलं. आता भुजबळ हे नाराज असल्याचं दिसत आहे. त्यामुळे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या विषयावर चर्चा करू शकतात. मोदींनीच त्यांना मंत्रिमंडळात घेतलंय, त्यामुळे मोदी त्यांचं ऐकू शकतात. आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी घटनादुरुस्ती आवश्यक आहे. आरक्षण पक्कं होण्यासाठी, त्याला कायदेशीर प्रारुप देण्यासाठी ते काम करून घेऊ शकतात.”
(बातमी अपडेट होत आहे.)