लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. ही शक्यता लक्षात घेऊन राज्यातील महाविकास आघाडीत जागावाटपाच्या प्रक्रियेला वेग आलाय. या जागावाटपादरम्यान कोल्हापूरच्या जागेची सध्या विशेष चर्चा होत आहे. कारण या जागेवर महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तशी चर्चा चालू आहे. याच शक्यतेवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी महत्त्वाचं विधान केलंय. ते ५ मार्च रोजी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.

संजय राऊत काय म्हणाले?

माध्यम प्रतिनिधींशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची आहे. शिवसेनेची छत्रपती शाहू महाराज यांच्याशी लोकसभेची निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा झालेली नाही. काँग्रेसने काय सांगितलं आहे हे आम्हाला माहिती नाही. कोल्हापूरची जागा शिवसेनेची असल्यामुळे आम्ही सर्वजण मिळून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याशी चर्चा करावी असं आम्हाला सूचवण्यात आलंय. कोल्हापूरची जागा शिवसेनेची असल्यामुळे त्या जागेवरून तुम्ही मशाल या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी विनंती आम्हाला छत्रपतींना करावी लागेल. त्यांची मान्यता आहे का? हे आम्हाला विचारावं लागेल.

“शाहू महाराजांसाठी आम्ही कोल्पापूरची जागा सोडायला तयार”

महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांमध्ये छत्रपती शाहू महाराज यांना कोल्हापूरचे तिकीट देण्यावर सहमती आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शाहू महाराजांसाठी आम्ही कोल्पापूरची जागा सोडायला तयार आहोत, असे पटोले म्हणाले होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांनी मात्र शाहू महाराजांनी निवडणूक लढवू नये, असे मत व्यक्त केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहू महाराज मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार का?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी खुद्द शाहू महाराज यांनीदेखील निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले होते. मी लवकरच नवी जबाबदारी स्वीकारणार आहे, असे ते एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते. त्यामुळे शाहू महाराज मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार की अन्य पर्यायाचा विचार करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.